‘दिलवाले’ने त्यागले प्राण
By Admin | Updated: November 17, 2015 00:33 IST2015-11-17T00:19:12+5:302015-11-17T00:33:36+5:30
संजय जाधव , पैठण बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज काढून धरणातून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी नेले. शेतातील पिकेही बहरात आली; मात्र धरणातून होणारा पाणीपुरवठा

‘दिलवाले’ने त्यागले प्राण
संजय जाधव , पैठण
बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज काढून धरणातून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी नेले. शेतातील पिकेही बहरात आली; मात्र धरणातून होणारा पाणीपुरवठा अचानक विद्युत पुरवठा खंडित करून बंद करण्यात आला. बघता बघता १० दिवसांत पिके कोमेजली व वाळून गेली .आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्याचा रक्तदाब वाढला व मेहनतीने सुखी जीवनाची स्वप्ने ज्या पिकाच्या आशेवर रंगवली त्याच सुकलेल्या पिकासोबत त्याने जगाचा निरोप घेतला .ही धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील वरुडी येथे घडली.
ज्ञानेश्वर शेषराव दिलवाले (वय ३७, रा.वरुडी) या शेतकऱ्याने रविवारी पाण्याअभावी सुकलेल्या कांद्याच्या शेतात आपला जीव सोडला. धरणात पाणी होते .शेतापर्यंत पाईपलाईन होती; परंतु विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नव्हते, पाईपलाईनसाठी काढलेले महाराष्ट्र बँकेचे १९ लाख रु. कर्ज डोक्यावर होते.
डोळ्यादेखत होणारे नुकसान व कर्ज फेडण्याच्या चिंतेने रक्तदाब
वाढून हृदयविकाराचा झटका येऊन ज्ञानेश्वर शेवटी आपल्या शेतात कोसळला.
वरुडी गावात ज्ञानेश्वरकडे १८ एकर जमीन. त्याने महाराष्ट्र बँकेतून पाईपलाईनसाठी १५ लाख रुपये कर्ज व पीक कर्ज म्हणून ४ लाख रुपये काढले होते. पाईपलाईन पूर्ण करून ६ एकर ऊस, ४ एकर कांदा असे पीक लावले. पाणी असल्याने पिके बहरली; परंतु दि. ५ नोव्हेंबर रोजी विद्युत पुरवठा बंद करून शेतीचे पाणी तोडण्यात आले.
बघता बघता कांदा वाळला. ऊस सुकला. पाणीपुरवठा काही चालू होईना. पाणीपुरवठा चालू व्हावा म्हणून ज्ञानेश्वर तालुक्यातील पुढारी, अधिकारी यांना भेटला; परंतु उपयोग झाला नाही. शेवटी त्याच्या हृदयाला भार सोसवला नाही.