छत्रपती संभाजीनगर : इंडियन सायकायट्रिक सोसायटी-पश्चिम विभाग आणि ‘गाव तिथे मानसोपचार’ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंत ‘डिजिटल डिटॉक्स’ जनजागृती मोहीम राबविली जात आहे. स्क्रीनच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये उद्भवणारे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम कमी करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, पालक गट व समुदायांमध्ये व्याख्याने आणि कार्यशाळांच्या माध्यमातून आरोग्यदायी डिजिटल सवयींचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
डिजिटल युगात किशोरवयीनांमध्ये स्क्रीनचा अतिवापर हा गंभीर मानसिक व सामाजिक प्रश्न बनला आहे. झोपेचा अभाव, चिंता, एकलकोंडेपणा, अभ्यासातील अडथळे यासारख्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलांमधील स्क्रीनच्या अतिवापराविरुद्ध डिजिटल डिटाॅक्स ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
विविध मानसोपचारतज्ज्ञांचा सहभागझोनमधील विविध मानसोपचारतज्ज्ञ ग्रामीण व शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, पालक गट आणि समुदायांमध्ये व्याख्याने व कार्यशाळा घेऊन या अभियानात सहभागी होत आहेत. डिजिटल डिटॉक्स हा फक्त स्क्रीनपासून दूर राहण्याचा सल्ला नाही, तर तो भविष्यातील पिढीसाठी मानसिक स्वास्थ्य जपण्याचा संकल्प आहे.- डॉ. अमोल देशमुख, प्रकल्प प्रमुख, गाव तेथे मानसोपचार, सायकायट्रिक सोसायटी- पश्चिम विभाग
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ?डिजिटल डिटॉक्स म्हणजे स्क्रीनचा अतिवापर टाळून, त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन स्क्रीनचा गरजेपुरता आणि सकारात्मक वापर करणे होय. सततच्या स्क्रीनटाईममुळे होणारा ताण, मानसिक थकवा, निद्रानाश, एकाग्रतेचा अभाव कमी करणे आणि प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंध, निसर्ग व स्वतःशीचा संवाद पुन्हा प्रस्थापित करणे हा असतो.
स्क्रीनमुक्तीचे फायदे...- मानसिक शांतता व ताणतणाव कमी होतो.- झोपेची गुणवत्ता सुधारते.- नातेसंबंध आणि संवाद सुधारतो.- कामात व अभ्यासात लक्ष केंद्रित होते.- डोळ्यांवरील ताण कमी होतो.
काय केले पाहिजे ?- मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर टाळणे.- जेवताना किंवा मित्र-परिवारासोबत गप्पा मारताना फोन न वापरणे.- बेडरूममध्ये मोबाईल न वापरणे.- सुट्टीत ‘नो स्क्रीन डे’ पाळणे.- निसर्गात वेळ घालविणे, पुस्तक वाचणे, छंद जोपासणे.