उद्या पहिला जथा जेद्दाहकडे होणार रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:22 IST2017-08-12T00:22:56+5:302017-08-12T00:22:56+5:30
यंदा मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक भाविक हज यात्रेला जाणार आहेत. १३ आॅगस्ट रोजी चिकलठाणा विमानतळावरून ३०० भाविकांचा पहिला जथा रवाना होणार आहे.

उद्या पहिला जथा जेद्दाहकडे होणार रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी हजला जाण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. यंदा मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक भाविक हज यात्रेला जाणार आहेत. १३ आॅगस्ट रोजी चिकलठाणा विमानतळावरून ३०० भाविकांचा पहिला जथा रवाना होणार आहे. शुक्रवार सायंकाळपासून यात्रेकरू जामा मशीद येथे दाखल होण्यास सुरुवात झाली.
औरंगाबादहून थेट जेद्दाहपर्यंत विमानसेवा उपलब्ध झाली आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून ही सेवा अखंडितपणे सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यातील हज यात्रेकरू पवित्र यात्रेला रवाना होणार
आहेत.
शुक्रवारी सायंकाळपासूनच हज यात्रेकरू ऐतिहासिक जामा मशीद येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी यात्रेकरूंच्या कागदपत्रांची तपासणी, पासपोर्ट देणे, सामानाची आवराआवर करण्यात येणार आहे. यात्रेकरूंना कोणताच त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मरकज-ए-हुज्जाज कमिटीच्या स्वयंसेवकांची फौज तैनात करण्यात आली आहे.
रविवार १३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.५५ वाजता १५० यात्रेकरूंचे पहिले विमान उड्डाण घेणार आहे. हज यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास राज्य हज कमिटीचे अध्यक्ष इब्राहीम भाईजान, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांची उपस्थिती राहणार आहे. रात्री ८ वाजता १५० यात्रेकरूंचे दुसरे विमान जेद्दाहकडे रवाना होणार आहे. दररोज दोन विमानांद्वारे यात्रेकरू रवाना होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे जामा मशीद ते विमानतळापर्यंत यात्रेकरूंना नेण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नेहरू भवनचा परिसरही यात्रेकरूंच्या सोयीसाठी ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती हुज्जाज कमिटीचे सदस्य साजीद अन्वर यांनी दिली.