महादेव मंदिरात भक्तांची मांदियाळी
By Admin | Updated: July 28, 2014 00:56 IST2014-07-27T23:54:51+5:302014-07-28T00:56:02+5:30
लातूर : मांजरा काठावरील धनेगावात महादेवाचे जागृत देवस्थान असून श्रावण मासात भक्तांची मांदियाळीच असते़ पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होतो़
महादेव मंदिरात भक्तांची मांदियाळी
लातूर : मांजरा काठावरील धनेगावात महादेवाचे जागृत देवस्थान असून श्रावण मासात भक्तांची मांदियाळीच असते़ पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होतो़
देवणी तालुक्यातील धनेगाव येथे पुरातन काळापासून महादेव मंदिर आहे़ मंदिरात शंभू-महादेवाची अत्यंत सुरेख मूर्ती आहे़ शिखर शिंगणापूरच्या मूर्तीपेक्षाही ती आकाराने मोठी आहे़ मूर्तीसमोर पिंड आहे़ पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रध्देने पूजाअर्चा करुन नतमस्तक होतात़ श्रावणमासात विशेषत: प्रत्येक सोमवारी भक्ताची संख्या लक्षणीय असते़ या ठिकाणी मांजरा नदी ही दक्षिणमुखी वाहिलेली असून या ठिकाणी नदीने चंद्रकोर वळण घेतले आहे़ महादेवाच्या डोक्यावरील हा चंद्र आहे अशी अख्यायिका आहेत़ अनेक भक्तगण वर्षभर महादेवाची पूजा करतात़ आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी नवस बोलून नारळ बांधतात अन् त्यांची इच्छा पूर्ण होते असे पूर्वज सांगतात़
मंदिराच्या शेजारी धनेगावचा बॅरेज प्रकल्प आहे़ मंदिर, बॅरेज आणि विद्यामंदिर त्रिकूट भक्तांसाठी आल्हाददायक वाटतो़ महादेवी द्वादशीदिवशी येथे यात्रा भरते़ हेळंबची महादेवाची काठी, बोटूकळची कावड असा विवाह सोहळा या मंदिरात पार पडतो़ दर्शनासाठी महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भाविक उपस्थितीत राहतात़ कुठल्याही शुभकार्याची सुरूवात ही महादेवाची पूजा बांधल्याशिवाय होत नाही़ शिवाय या देवस्थानला हिंदू मुस्लिम हे दोन्हीही समाज बांधव मानत असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन येथे घडते़ श्रावणमासात दररोज पूजा, दुग्धाभिषेक, भजन कीर्तन आरती अशा कार्यक्रमाबरोबरच गावातील प्रत्येक जण महादेवाला स्रान घालतात़ मगच आपल्या कार्याची सुरूवात करतात़