देवगिरी, कैलास लेण्यांच्या पायथ्याशी रानमेवा
By Admin | Updated: October 27, 2014 00:13 IST2014-10-26T23:52:05+5:302014-10-27T00:13:05+5:30
खुलताबाद : दौलताबाद व खुलताबाद परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सीताफळांची आवक कमी झाली आहे

देवगिरी, कैलास लेण्यांच्या पायथ्याशी रानमेवा
खुलताबाद : दौलताबाद व खुलताबाद परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सीताफळांची आवक कमी झाली आहे. डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी महिला हा सीताफळांचा रानमेवा घेऊन दौलताबाद, वेरूळ येथील लेण्यांच्या पायथ्याशी बसून विक्री करीत आहेत.
खुलताबाद, दौलताबाद परिसरात मोठ्या प्रमाणात सीताफळांची झाडे आहेत, तसेच दौलताबादची सीताफळे ही खाण्यास चांगली असा नावलौकिक देखील या रानमेव्याला मिळालेला आहे. दररोज हजारो पर्यटक दौलताबाद, वेरूळ लेण्यांना भेट देतात. रस्त्याच्या कडेला बसून आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात सीताफळांची विक्री करताना दिसत आहेत. साधारणपणे १०० ते १५० रुपयाला टोपलीभर सीताफळे मिळत असल्याने पर्यटकही मोठ्या आनंदाने ती खरेदी करीत आहेत. त्यामुळे या आदिवासी महिलांना घरबसल्या बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यातच दिवाळीच्या सुट्या असल्याने पर्यटकांनी गर्दी या ठिकाणी होत आहे. त्याचा खूप मोठा फायदा या रानमेव्यांच्या विक्रीला होत आहे. या माध्यमातून आदिवासी महिलांना चांगला रोजगारदेखील मिळाला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम सीताफळांवर झाला असून म्हणावी तशी फळे बहरली नाहीत, त्यामुळे बाजारात सीताफळांना चांगली मागणी आहे. (वार्ताहर)