विकासाचे शेंद्रा‘बन’
By Admin | Updated: April 6, 2016 01:28 IST2016-04-06T00:45:16+5:302016-04-06T01:28:13+5:30
औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीलगतच्या शेंद्रा बन आणि गंगापूर जहांगीर या गावचे रहिवासी आता विकासाची मधुर फळे चाखत आहेत.

विकासाचे शेंद्रा‘बन’
औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीलगतच्या शेंद्रा बन आणि गंगापूर जहांगीर या गावचे रहिवासी आता विकासाची मधुर फळे चाखत आहेत. अपार्टमेंट व रो-हाऊसची शेकडो बांधकामे जणू येथे वास्तव्यास येण्याची शहरवासीयांना सादच घालत आहेत.
कार्डद्वारे मिळणारे शुद्ध पाणी, गरोदर महिलांसाठी माहेरघर, तरुणांसाठी व्हॉलीबॉलचे मैदान, प्रत्येक घरावर टाकण्यात आलेली घरमालक आणि मालकिणीची नावे, गावाच्या संरक्षणासाठी लाभलेले ‘सीसीटीव्ही’चे कवच, सर्व ग्रामस्थांना घरपोेच देण्यात आलेली विविध प्रमाणपत्रे, भूमिगत ड्रेनेजलाईन, सौर ऊर्जेवर प्रकाशमान होणारे पथदिवे, कचऱ्यातून केली जाणारी खतनिर्मिती, शाळेत उपलब्ध असणारी ई-लर्निंगची सुविधा ही या गावाची वैशिष्ट्य म्हणावी लागतील.
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत स्कोडा कंपनीच्या पाठीमागे शेंद्रा बन हे गाव आहे. शेंद्रा बन आणि लगतचे गंगापूर जहांगीर, अशी मिळून गट ग्रामपंचायत आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे २,४०० च्या घरात आहे. शेंद्रा बन येथील ७० टक्के जमिनी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातीले काही बिल्डरांनी आपला मोर्चा आता या परिसरात वळविला आहे. सद्य:स्थितीत येथे शेकडो फ्लॅट, रो-हाऊस बांधून तयार असून, भविष्यात हा परिसर एखाद्या टुमदार शहरातच रूपांतरित होणार असल्याचे चित्र आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखाने, नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारती यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा खात्रीचा मार्ग सापडला आहे.
असा झाला कायापालट
तीन वर्षांपूर्वी शेंद्रा बन हे गाव सामान्य खेड्याप्रमाणे होते. उघड्यावर शौचास जाणारे ग्रामस्थ, गावातून वाहणाऱ्या गटारी, सततची पाणी टंचाई, असे गावचे चित्र होते; परंतु एकेदिवशी ग्रामस्थांनी पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार या गावास भेट दिली. त्याचवेळी शेजारचे कुंभेफळ हे विकास कामांमुळे प्रकाशझोतात आले होते. आता आपल्यालाही त्याच दिशेने मार्गक्रमण करायचे, असा संकल्प ग्रामस्थांनी केला. परिणामी, आज गावाचा कायापालट झालेला दिसत आहे.
‘सीसीटीव्ही’चे कवच
गावातील मुख्य रस्ते, गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर २३ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण गावावर अशा प्रकारे तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’ असल्याने किरकोळ वाद मिटले आहेत. भांडणे केल्यास आपण कॅमेऱ्यात कैद होऊत या भीतीने प्रत्येक जण सामंजस्याने वागण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भूमिगत ड्रेनेजलाईन
भूमिगत ड्रेनेजलाईनमुळे या छोट्याशा गावात कुठेही रस्त्यावर सांडपाणी वाहताना दिसत नाही. सुमारे २० लाख रुपये खर्चून ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. त्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल.
गावातील विजेच्या खांबांवर सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्यात आली आहेत. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. आगामी काळात सौर ऊर्जेचे आणखी प्रकल्प राबविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.
अशी झाली प्रमाणपत्रमुक्ती
महसूल खात्यात मंडळ अधिकारी असणारे सतीश तुपे हे या गावचे रहिवासी. विविध प्रमाणपत्रांसाठी ग्रामस्थांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी तुपे यांनी पुढाकार घेतला. विशेष मोहीम राबवून विद्यार्थी, ग्रामस्थांना घरपोच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे प्रमाणपत्रांसाठी औरंगाबादला येण्याच्या कटकटीतून ग्रामस्थांची कायम सुटका झाली आहे.
गावचे कारभारी
सरपंच- संजय पाटुळे, उपसरपंच- भाऊलाल तरटे, ग्रामसेवक- विलास कचकुरे, सदस्य- कल्याण तुपे, रंजनाबाई तुपे, कांताबाई भुसारे, सरला काळे, सोनाबाई सुलाने.