पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास
By Admin | Updated: August 11, 2014 00:32 IST2014-08-11T00:30:31+5:302014-08-11T00:32:32+5:30
पाचोड : पैठण तालुक्याच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ६० लाख रुपयांचा निधीमंजूर केला असून, काही ठिकाणी कामे सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य, विनोद ताबे यांनी रविवारी पाचोड येथे दिली.

पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास
पाचोड : पैठण तालुक्याच्या काही गावांतील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंत्रालयातील पर्यटन क्षेत्र विभागाकडून मंजूर केला असून, काही ठिकाणी कामे सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य, गटनेते तथा नियोजन मंडळाचे सदस्य विनोद ताबे यांनी रविवारी पाचोड येथे दिली.
पैठण तालुक्यात चौंढाळा येथे रेणुकामाता देवीचे, आपेगाव येथे ज्ञानेश्वर महाराज, कडेठाण येथे महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. या गावातील तीर्थक्षेत्रांवर विविध जिल्ह्यांतून, गावागावांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हे तीर्थक्षेत्र ग्रामीण भागात असल्यामुळे विकासापासून वंचित होते. त्यामुळे पर्यटक, भाविकांना त्रास होत होता. या ठिकाणी विकास होणे आवश्यक आहे. हा धागा पकडून तांबे यांनी आपेगाव येथे अॅप्रोच रोड तयार करणे, चौंढाळा गावाअंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे, गटार बांधकाम करणे, वाहेगाव येथे सिमेंट रस्ता तयार करणे, वडवाळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, वडवाळी येथे सिमेंट रस्ता तयार करणे आदी कामांचा प्रस्ताव २ जुलै २०१३ रोजी जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्याकडे पाठविला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ३० आॅक्टोबर २०१३ रोजी तांबे यांनी सुचविल्याप्रमाणे अहवाल तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. विनोद तांबे यांनी मंत्रालय स्तरावर सतत पाठपुरावा करून ३० डिसेंबर २०१३ रोजी शासनाकडून दहा कामांपैकी सहा कामांना मंजुरी मिळविली.
यासंदर्भात तांबे म्हणाले की, मंजूर झालेल्या कामांमध्ये श्रीक्षेत्र आपेगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९ लाख ९५ हजार रुपये, श्रीक्षेत्र वाहेगावसाठी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९ लाख ९६ हजार रुपये, श्रीक्षेत्र चौंढाळा गावात मंदिर परिसरात गटार बांधकाम करण्यासाठी ९ लाख ९८ हजार रुपये, मंदिर परिसरात अॅप्रोच रोड तयार करण्यासाठी ९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर या मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांपैकी चौंढाळा तीर्थक्षेत्रावर कामे सुरू झाली आहेत. श्रीक्षेत्र वाहेगाव येथील कामाचे टेंडर निघाले असून, तेथील काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)