मुंबई, पुण्याप्रमाणे औरंगाबादचाही विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST2021-06-29T04:04:11+5:302021-06-29T04:04:11+5:30
औरंगाबाद : राज्यातील प्रमुख शहरांचा ज्या पद्धतीने विकास झाला त्याच पद्धतीने औरंगाबाद शहरही भरारी घेईल. मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद शहराचाच ...

मुंबई, पुण्याप्रमाणे औरंगाबादचाही विकास
औरंगाबाद : राज्यातील प्रमुख शहरांचा ज्या पद्धतीने विकास झाला त्याच पद्धतीने औरंगाबाद शहरही भरारी घेईल. मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद शहराचाच क्रमांक लागेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी पायाभूत सोयी-सुविधांवर मागील काही वर्षांमध्ये चांगले काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शहागंज येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर सोमवारी माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, माजी आ. कल्याण काळे, सुभाष झांबड, किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय समारोपप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. व्यापाऱ्यांना त्रास देण्याची इच्छा नाही. संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा उपाययोजना कधीही चांगल्या. पहिल्या, दुसऱ्या लाटेत प्रशासनाने खूप चांगले काम केले. शहरातील अनेक वसाहतींना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. नागरिकांना दोन वेळा पाणी देण्याबाबतही सूचना केली आहे. गुंठेवारीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
प्रारंभी आ. सावे यांनी नमूद केले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रलंबित होते. खैरे यांनी निधी दिल्याने पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्णत्वास आले. या कार्यक्रमाला भाजपचा विरोध नाही. खैरे यांनी उद्यानाचे शहागंज चमनऐवजी सरदार वल्लभभाई पटेल उद्यान, असे नामकरण करण्यासाठी महापालिकेस पत्र देण्यात येईल, असे सांगितले. प्रास्ताविक प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्य सैनिक ताराबाई लढ्ढा यांचा सत्कार करण्यात आला.
खैरे अजूनही खासदारच...
कार्यक्रमात भाजपसह विविध वक्त्यांनी माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख खासदार म्हणून केला. माजी महापौरांनाही महापौर म्हणूनच संबोधण्यात आले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
सेना, भाजप, काँग्रेस नेत्यांची हजेरी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी शिवसेना, भाजप, काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुजराती समाजातील ज्येष्ठ नागरिक, समाजबांधवही यावेळी उपस्थित होते.