लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे २५ गावांचा विकास खुंटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:04 IST2021-04-05T04:04:42+5:302021-04-05T04:04:42+5:30
किनगाव फाटा ते बाजारसावंगी हा या भागातील तीन तालुक्यांसह २५ गावांना जोडणारा मुख्य रस्ता ...

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे २५ गावांचा विकास खुंटला
किनगाव फाटा ते बाजारसावंगी हा या भागातील तीन तालुक्यांसह २५ गावांना जोडणारा मुख्य रस्ता असून गेल्या १५ ते २० वर्षांपासून नुसत्याच आश्वासनांच्या ‘पंगती’ उठत आहेत. प्रत्यक्षात काम होत नसल्याने २५ गावांतील नागरिकांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. किनगाव फाटा ते बाजारसावंगी, ताजनापूर गाव ते बाजारसावंगी, इंदापूर ते बाजारसावंगी, बोडखा ते इंदापूर, रेल ते धामणगाव, बोडखा ते धामणगाव राजेराय टाकळी, रेल ते बाजारसावंगी, झरीफाटा ते वडगाव, दरेगाव ते पाडळी, झरीफाटा ते पाडळी, शेखपूरवाडी ते बाजारसावंगी, पाडळी ते शिरोडी, येसगाव नंबर एक ते माणिकनगर या रस्त्याचे पूर्णतः तीन तेरा वाजलेले आहेत. यावरून प्रवास करताना या भागातील नागरिकांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
परिसरातील या गावांचे रस्ते खराब झाल्याने नागरिकांना ये-जा करताना रोज नरकयातना सोसाव्या लागत आहेत. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी या भागाकडे कानाडोळा केल्याने अनेक कामे रखडली आहेत. आमदार प्रशांत बंब यांनी १५ वर्षांपूर्वी पहिल्या निवडणुकीत या भागातील रस्ते गुळगुळीत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन पंचवार्षिकपासून तेच आश्वासन पुन:पुन्हा देऊनही रस्त्यांची दुरुस्ती तर सोडा, खड्डे बुजविण्याचीही तसदी घेतलेली नाही. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीच्या मणक्याचे आजार जडले आहेत. नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देऊनही रस्ते दुरुस्त झाले नाहीत.
040421\20200902_150853_1.jpg
बाजारसावंगी परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था