गेवराई कुबेरमध्ये कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:06 IST2021-04-23T04:06:24+5:302021-04-23T04:06:24+5:30
दुधड : औरंगाबाद तालुक्यातील गेवराई कुबेर गावात कोरोनाचा कहर सुरू आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल ६६ जणांना ...

गेवराई कुबेरमध्ये कोरोनाचा कहर
दुधड : औरंगाबाद तालुक्यातील गेवराई कुबेर गावात कोरोनाचा कहर सुरू आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात तब्बल ६६ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दहशतीने गावातील बहुतेक कुटुंब शेतवस्तीवर राहत असल्याने गावात शुकशुकाट पसरला आहे.
लाडसांवगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गेवराई कुबेर गावाचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या गावावर कहर केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. बघता बघता आज गावात कोरोनाने वेढा दिला असून पंधरा दिवसांत ६६ जणांना लागण झाली. २० रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर काही बाधित रुग्ण शेतवस्तीवर अलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली डकले यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात तळ ठोकला आहे. त्यांच्यासमवेत आरोग्यसेविका सोनवणे, दिघे, पडूळ हे रुग्णांना उपचार देत आहेत. गेवराईला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
जि.प. अध्यक्षांनी केली पाहणी
जि.प. अध्यक्षा मीना शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांच्यासमवेत गावात पाहणी केली. येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, रामुकाका शेळके, पं.स.च्या सभापती छाया घागरे, सहायक गटविकास अधिकारी गायके, नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली डकले आदींची उपस्थिती होती.