देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरला येईल मार्चपासून गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:03 IST2021-07-26T04:03:27+5:302021-07-26T04:03:27+5:30
औरंगाबाद : प्रस्तावित देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येणारे सामान्य सुविधा केंद्र (सीएफसी) पूर्णत्वास येत असून येणाऱ्या ...

देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरला येईल मार्चपासून गती
औरंगाबाद : प्रस्तावित देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येणारे सामान्य सुविधा केंद्र (सीएफसी) पूर्णत्वास येत असून येणाऱ्या खऱ्या अर्थाने मार्चपासून हे क्लस्टर गती घेईल. या क्लस्टरमुळे औरंगाबादेतील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात नव्याने येणारे स्टार्टअप, व्हेंडर्स, लघु उद्योजकांसमोर आर्थिक, जागा, महागडी यंत्रसामग्री, संशोधन आणि विकास, टेस्टिंग या बाबींच्या मोठ्या समस्या आहेत. यापुढे त्यांना या सुविधा केंद्रातील यंत्रसामग्रीची मोठी मदत होणार आहे. उत्पादन खर्चातही मोठी बचत होणार असून इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाबाबत तांत्रिक मार्गदर्शनही उपलब्ध होईल. हे केंद्र (सीएफसी) मार्च २०२२ पासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरच्या संचालक मंडळाचे नियोजन आहे.
शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये २८ उद्योजकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरच्या ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या पहिल्या टप्प्याचे काम सन २०१७ पासून सुरू झाले. ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’च्या (सीएमआयए) माध्यमातून या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या केंद्राची इमारत आता तयार झाली असून लवकर वेगवेगळ्या मशिनरीही येथे उपलब्ध होतील. या सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी २०.५८ कोटी रुपये केंद्र सरकार, २.७२ कोटी रुपये राज्य सरकार आणि उर्वरित ५.२८ टक्के रक्कम उद्योजकांनी गुंतविली आहे. २ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या सुविधा केंद्राची इमारत व यंत्रसामग्रीसाठी २८.५८ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.
चौकट.........................
‘वर्ल्ड क्लास’ उत्पादने तयार करण्यास मदत
औरंगाबादेतील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना नवे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठी सामान्य सुविधा केंद्राची (सीएफसी) गरज होती. या केंद्राचा इलेक्ट्रॉनिक उद्योगांना चांगला फायदा होणार आहे. या सुविधा केंद्रामुळे प्रॉडक्ट रीसर्च, टेस्टिंग आदी कामांसाठी उद्योजकांना दुसऱ्या शहरात माराव्या लागणाऱ्या चकरा आता थांबतील. या क्लस्टरच्या माध्यमातून येथील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांना ‘वर्ल्ड क्लास’ उत्पादने तयार करण्यासाठी मदत होणार आहे.
- सुरेश तोडकर, अध्यक्ष, देविगरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर