संत नामदेव महाराजांच्या दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान
By Admin | Updated: June 16, 2014 00:13 IST2014-06-16T00:03:04+5:302014-06-16T00:13:32+5:30
नर्सी नामदेव : संत नामदेव महाराजांची पायी दिंडी १६ जून रोजी दुपारी ३ वाजता नर्सी येथून प्रस्थान करणार आहे.
संत नामदेव महाराजांच्या दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान
नर्सी नामदेव : संत नामदेव महाराजांची पायी दिंडी १६ जून रोजी दुपारी ३ वाजता नर्सी येथून प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्त नर्सीच्या मुख्य रस्त्यावरून ग्रामप्रदक्षणा करून पहिल्या दिवशी मुक्काम नर्सी येथेच राहणार आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत आहेत. सुमारे २० दिवसांचा पायी प्रवास करीत नर्सी येथून संत नामदेव महाराज यांची पायीदिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांची दिंडीस वाखरी येथील भेटीचा आनंद अर्वनीय असतो; परंतु इतर दिंडीच्या तुलनेत या दिंडीस पाहिजे तेवढ्या सुविधा मिळत नाहीत. त्या सुविधा सर्वांप्रमाणेच या दिंडीस मिळाव्यात, अशी मागणी दिंंडीचालक बळीराम सोळंके यांनी केली आहे.
संत नामदेव महाराजांची दिंडी दुपारी ३ वाजता संत नामदेव महाराजांच्या मंदिराजवळून टाळ, मृदंग, नामगजरात निघणार आहे. गावातील रस्त्यावरून ही पालखी जाणार आहे. दिंडीच्या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. अद्याप त्याचा विचार करण्यात आलेला नाही. मिरवणूकद्वारे ही दिंडी नर्सीतील संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळी मुक्कामी पोहोचणार आहे. रात्री कीर्तन, भजन होवून सकाळी ७ वाजता केसापूर, सवडमार्गे निघालेल्या पालखीचा मुक्काम हिंगोलीत होईल. पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या मार्गावर नामदेव महाराजांच्या भक्तांकडून दिंडीचे स्वागत करून अन्नदान करतात. अंबाजोगाईत ‘श्री’चे गोल रिंगणावेळी हजारो भाविकांची उपस्थिती असते. हा प्रसंगी सर्वांत आनंददायी ठरतो. रस्त्याने जाताना होणारे स्वागत पाहून मन भारावून जाते, असे सोळंके यांनी सांगितले. (वार्ताहर)