आरोग्य विभागाला महागाईचा सोस!
By Admin | Updated: February 5, 2015 00:54 IST2015-02-05T00:33:47+5:302015-02-05T00:54:56+5:30
बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तत्पर व सुरळीत आरोग्यसेवेसाठी ३९ वाहने अव्वाच्यासव्वा रुपये देऊन भाड्याने घेतलेली आहेत.

आरोग्य विभागाला महागाईचा सोस!
बीड : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तत्पर व सुरळीत आरोग्यसेवेसाठी ३९ वाहने अव्वाच्यासव्वा रुपये देऊन भाड्याने घेतलेली आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णांचे आरोग्य सुधारले की नाही माहीत नाही; परंतु ‘सरकारी तिजोरी’ मात्र रिती होत चालली आहे. ‘बचतमंत्रा’चा सर्वत्र बोलबाला असताना येथील आरोग्य विभागाला मात्र गेल्या काही दिवसात महागाईचा सोस सुटायला तयार नाही, हे पुढे आले आहे.
अंगणवाडी ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांचे आरोग्य ठणठणीत रहावे, यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. याअंतर्गत ३९ पथकांमार्फत अंगणवाड्या, शाळांमध्ये जाऊन तपासणी करुन उपचार केले जातात. या पथकांमध्ये एक पुरुष, एक महिला डॉक्टर, एक परिचारिका, एक औषधनिर्माता यांचा समावेश आहे. दरम्यान, या पथकांना शाळा, अंगणवाडी भेटींसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून ३९ चारचाकी वाहने कंत्राटी स्वरुपात भाड्याने घेतलेली आहेत. या वाहनांना महिन्याकाठी तब्बल २० हजार रुपयांप्रमाणे सुमारे ७ लक्ष ८० हजार रुपये इतकी रक्कम मोजली जाते. डॉक्टरांच्या पथकाचा दौरा दररोज नसतो, मात्र, भाड्याचे ‘मीटर’ रोजच्या हिशेबाने गृहित धरले जाते. त्यामुळे निधीची उधळपट्टी होत आहे. सलग दोनदा डिझेलच्या दरात कपात झालेली असून बाजारातील भाड्याचे दरही कमी झालेले आहेत. आरोग्य विभाग मात्र जुन्याच महागड्या दराने पैसे मोजत आहे.
सारे नियमानुसारच
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे म्हणाले, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम सीएस यांच्या नियंत्रणाखाली राबविला जातो. भाड्याने घेतलेल्या वाहनांना जादा दराने पैसे दिले जातात असे नाही. निविदा प्रक्रिया राबवून वाहने घेतलेली आहेत. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत भाड्याने घेतलेल्या ३९ वाहनांचे कंत्राट दीड महिन्यांपूर्वीच संपलेले आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने निविदा काढल्या. मात्र, अद्याप प्रक्रिया पूर्ण नाही. असे असतानाही जुन्याच एजन्सीची वाहने मुदतीनंतरही दिमतीला आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी या दोन्ही अधिकाऱ्यांना ‘एनएचएम’मधून भाड्याने वाहने उपलब्ध केलेली आहेत. सुविधायुक्त व वातानुकुलित असलेल्या या दोन चारचाकी कंत्राटी स्वरुपात दिमतीला आहेत. त्यांचा दर किलोमीटरप्रमाणे आहे. बाजारात ९ रुपये दराने वाहने उपलब्ध असताना आरोग्य विभाग मात्र, ‘होऊ द्या खर्च’ या अविर्भावात तब्बल १६ रुपये किलोमीटरप्रमाणे पैसे मोजत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.