‘हेडगेवार’च्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशीही निदर्शने
By Admin | Updated: July 1, 2014 01:09 IST2014-07-01T00:57:39+5:302014-07-01T01:09:00+5:30
औरंगाबाद : डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या बॅनरखाली वेतनवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे.

‘हेडगेवार’च्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशीही निदर्शने
औरंगाबाद : डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या बॅनरखाली वेतनवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे. दोन दिवसांपासून हे कर्मचारी ड्यूटी संपताच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी व निदर्शने करत आहेत. सोमवारी दुपारी झालेल्या निदर्शनांमुळे रुग्णालयाचे प्रवेशद्वार दणाणून गेले.
डॉ. हेडगेवार रु ग्णालयात भारतीय मजदूर संघटना आणि इंटर्नल कर्मचारी संघटना सक्रिय आहेत. या दोन्ही संघटनांनी वेतनकरार करावा, यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा १३ हजार रुपये वेतनवाढ द्यावी, अतिरिक्त कामाचा मोबदला दुप्पट दराने द्यावा, रजेचे रोखीकरण करावे आदी मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत २७ बैठका घेऊन ३ हजार ७०० रुपये वेतनवाढ देण्याची तयारी दाखविली. मात्र, संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने आंदोलन चिघळल्याचे दिसते.
याविषयी संघटनेचे प्रतिनिधी प्रमोद जावळे म्हणाले की, आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सोमवारी झालेल्या निदर्शनांमध्ये प्रमोद जावळे, विठ्ठल पाटील, संजय वंजारे, संतोष गव्हाळे, चंद्रप्रकाश जमदाडे, गिरजाराम डक ले, कल्याण सोनवणे, अंकुश औटे, देवीदास पवार, नारायण घोडके, प्रकाश चव्हाण, बाळू सोनवणे, दीपा पैठणकर, राखी बत्तिसे, मनीषा कांबळे, मनीषा बत्तिसे आदींचा सहभाग होता.
मागण्या अवास्तव
रुग्णालयाचे संचालक डॉ. अनंत पंढेरे यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की, डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन हे शहरातील अन्य रुग्णालयांपेक्षा अधिक आहे, असे असताना आम्ही ३ हजार ७०० रुपये पगारवाढ देऊ केली आहे. त्यासाठी संघटनेसोबत आमच्या २७ बैठका झाल्या.
मात्र, कर्मचारी संघटनेने १३ हजार पगारवाढ मागितली आहे. कर्मचाऱ्यांच्या अवास्तव मागण्या प्रशासन मान्य करणार नाही.