नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी
By Admin | Updated: May 21, 2014 00:15 IST2014-05-21T00:01:33+5:302014-05-21T00:15:25+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील लेंडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची उंची अतिशय कमी आहे.

नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील लेंडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. परिणामी, छोटा पूल असून, अडचण अन् नसून खोळंबा होत असल्याने लेंडी नदीवरील या पुलाची उंची वाढविण्याची मागणी दैठणा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, मांजरा या मोठ्या नद्यांच्या खालोखाल लेंडी नदी असून या नदीचे पात्र खूप मोठे आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर नदीपात्र काठोकाठ भरून जाते. या मोठ्या नदीवर दैठणा गावाजवळ अतिशय कमी उंची असलेला पूल बांधण्यात आला आहे. सिमेंट पाईप टाकून बांधण्यात आलेला पूल छोटा असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहते. तासन् तास पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारीस याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असल्याने या मार्गाने उदगीर आगाराच्या बसच्या दिवसभरात पाच ते सात फेर्या होतात. शिवाय, जागृती कारखाना, देवणी, उदगीर येथे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने खाजगी वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. परंतु, या वाहतुकीस पुलावरून वाहणार्या पुराच्या पाण्यामुळे तासन् तास पाणी कमी होण्याची वाट पाहत थांबावे लागते. (वार्ताहर) शेतकर्यांची अडचण़़़ दैठणा गावाचा निम्मा शिवार नदीच्या पलिकडे असल्याने पावसाळ्यात शेतकर्यांची सुद्धा खते, बियाणे घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. नदीवरील छोटा पूल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा होत असल्याने उंची वाढविण्याची मागणी होत आहे. बजेटमध्ये टाकू़़़ याबाबत बांधकाम उपविभागाचे उपअभियंता वसमतकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पुलाची उंची वाढविण्यासाठी बजेटमध्ये टाकून मंजुरी घेऊ.