निवृत्तीवेतन महिन्याच्या पहिल्या दिवशी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:04 IST2021-04-22T04:04:21+5:302021-04-22T04:04:21+5:30
-- औरंगाबाद : एप्रिल महिना सरत आला तरीदेखील जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांना अद्याप मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन प्राप्त झालेले ...

निवृत्तीवेतन महिन्याच्या पहिल्या दिवशी देण्याची मागणी
--
औरंगाबाद : एप्रिल महिना सरत आला तरीदेखील जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांना अद्याप मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन प्राप्त झालेले नाही. कधी बजेटच नसते तर कधी पगार बिलाच्या संचिका अधिकाऱ्यांच्या टेबलावर सहीसाठी रेंगाळतात. उशिराने आणि अनियमित निवृत्तीवेतन केले जात आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी पेन्शन मिळावी, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा पेन्शनर असोसिएशनने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडे केली आहे.
लाखात असे एक दोन वयोवृद्ध मिळतील जे शेवटपर्यंत धडधाकड असतील. त्यात कोरोना महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी सशक्त व्यक्तीपासून वयोवृद्ध या सर्वांची धडपड आहे. त्यात आम्ही पेन्शनर्स आलोच. प्रत्येकाला कोणता ना कोणता आजार जडलेलाच, सोबत जीवनाची साथीदार पत्नीही कुठल्या तरी आजाराने त्रस्त असतेच. त्यात पेन्शनमध्ये संसार हा दुखणे सोबत घेऊन चालवायचा. खूपच तारांबळ होते. त्यामुळे पेन्शनर्स लोकांचे हाल थांबवा. पेन्शन वेळेवर द्या, अशी विनंती अध्यक्ष वसंत सबनीस, विकास बाविस्कर यांनी केली. त्याकडे लक्ष देण्याच्या लचना डॉ. गोंदावले यांनी दिल्यावर शिक्षण विभाग व सामान्य प्रशासन विभागाकडून निवृत्ती वेतन देयके वेळेवर दाखल केले जात नाही. वित्त विभागातून एक-दोन दिवसात बिल झाल्यावर आरटीजीएस केल्या जात असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी सांगितले. तर पुढील एक दोन दिवसांत प्रश्न मार्गी लागेल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी सांगितले.