अंध-अपंग ‘अंबादास’चा दोरखंड विक्रीतून उदरनिर्वाह
By Admin | Updated: May 29, 2014 00:33 IST2014-05-29T00:09:07+5:302014-05-29T00:33:14+5:30
माधव शिंदे , मसलगा डोळ्यांनी अंध व अनाथ असलेल्या वयोवृद्ध अंबादास काळे हे मात्र वयाच्या ८५ व्या वर्षीही दोरखंडाच्या दोरीतून उदरनिर्वाह करीत जगण्यासाठी धडपड करीत आहेत.

अंध-अपंग ‘अंबादास’चा दोरखंड विक्रीतून उदरनिर्वाह
माधव शिंदे , मसलगा अवतीभोवती अनाथ, अपंग म्हणून भीक मागणारे अनेकजण दिसतात. परंतु, डोळ्यांनी अंध व अनाथ असलेल्या वयोवृद्ध अंबादास काळे हे मात्र वयाच्या ८५ व्या वर्षीही दोरखंडाच्या दोरीतून उदरनिर्वाह करीत जगण्यासाठी धडपड करीत आहेत. निलंगा तालुक्यातील गौर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. बालपणीच आजाराने त्यांचे डोळे गेले. त्यामुळे त्यांचे बालपण आई-वडिलांच्या अंगा-खांद्यावर गेले. तारुण्यामध्ये शेतातील गुरंढोरं राखून जीवन जगण्यास सुरुवात केली. अंध असल्याने त्यांना रेडिओशी मैत्री करावी लागली. अर्ध्यातच आईचेही छत्र हरवल्याने अंबादास काळे यांच्या नशिबी अनाथाचे जीवन आले. तरीही त्यांनी खचून न जाता नव्याने जीवन जगण्याचे ठरविले. शेतीसाठी आवश्यक असणारे दोरखंड तयार करण्याचे काम त्यांनी स्वीकारले व मारुती मंदिरातच मुक्काम करून आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग त्यांनी निर्माण केला. गावातील ग्रामस्थांशी प्रेम दाखवून पोटाला अन्न, राहण्यासाठी निवारा, वस्त्र घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून माणुसकीचा धर्म त्यांनी जपला. दिवसा गावातील सिमेंट प्लास्टीकचे पोते गोळा करून त्या पोत्यांपासून दिवसभर मंदिरामध्ये दोरखंड वळण्याचे काम त्यांनी सुरू केले. दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने त्यांना नोटांची ओळख लागायची नाही. तरीही त्यांनी हातावर तयार केलेली दोरी गळ्याभोवती ठेवून हातावर मोजून त्या दोरीचा मोबदला घेऊन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कामाची जिद्द... गेल्या २५ वर्षांपासून मारुती मंदिरात मुक्काम करीत अंध, अनाथ अंबादास काळे यांनी आपला उदरनिर्वाह दोरखंडातून सुरू केला असला, तरी त्यांच्या अपंगत्वाची अद्यापपर्यंत कोणीही दखल घेतली नाही. शासकीय योजनेचा लाभही त्यांना मिळाला नाही. अंध, अपंगाच्या नावावर बरेचजण शासकीय योजनेचा लाभ घेतात. परंतु, अंबादास काळे यांच्यासारखे खरे लाभार्थी या पासून वंचित आहेत. तरीही त्यांची कामाची जिद्द सुरुच आहे़