वेतन घोटाळ्याच्या अहवालात दिरंगाई; चौकशी पथकाला नोटीस
By Admin | Updated: November 18, 2016 00:44 IST2016-11-18T00:45:41+5:302016-11-18T00:44:53+5:30
बीड : जिल्हा परिषदेतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन बेकायदेशीररीत्या काढून घोटाळा करणाऱ्यांचा अहवाल सीईओ नामदेव ननावरे यांनी मागवला होता.

वेतन घोटाळ्याच्या अहवालात दिरंगाई; चौकशी पथकाला नोटीस
बीड : जिल्हा परिषदेतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन बेकायदेशीररीत्या काढून घोटाळा करणाऱ्यांचा अहवाल सीईओ नामदेव ननावरे यांनी मागवला होता. दीड महिन्यानंतरही अहवाल देण्यास चौकशी पथकाने टाळाटाळ केली. त्यामुळे गुरूवारी सीईओंनी चौकशी पथकाला नोटीस बजावली आहे.
जि.प.मध्ये एप्रिल २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीत हा वेतन घोटाळा झाल्याचा संशय आहे. या संदर्भात कास्ट्राईबने तक्रारी केल्या होत्या. शिवाय, ‘लोकमत’ने प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर सीईओ ननावरे यांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत दोन लेखाधिकाऱ्यांना वेतन बिलाची पडताळणी करून अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला चौकशी पथकाने केराची टोपली दाखवली. त्यामुळे सात दिवसांत अहवाल सादर करा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबी ननावरे यांनी नोटिसीद्वारे दिली आहे. त्यामुळे चौकशी पथकाचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)