२९ गावांत निर्जळी
By Admin | Updated: June 25, 2014 01:27 IST2014-06-25T01:14:45+5:302014-06-25T01:27:33+5:30
जायकवाडी : टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण एमआयडीसीचा विद्युत पंप जळाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला आहे .

२९ गावांत निर्जळी
जायकवाडी : टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण एमआयडीसीचा विद्युत पंप जळाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला असून परिसरातील २९ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
जायकवाडी परिसरातील २९ गावांना ३० एप्रिलपासून एमआयडीसीच्या पॉर्इंटवरून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या पॉर्इंटवरून ३७ टँकरद्वारे ७१ खेपा पाणी भरले जाऊन ग्रामस्थांच्या सोयीप्रमाणे पाणी पुरविले जाते. एमआयडीसीच्या नाथसागरातील पंप हाऊसमधील विद्युत पंप सोमवारी रात्री अचानक जळाल्याने आज टँकरमध्ये पाणी भरता आले नाही. त्यामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या या गावांत पिण्याच्या पाण्याच्या टँकरशिवाय कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्याने जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत. पावसाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही परिसरात पावसाचा थेंब पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. एमआयडीसीचा विद्युत पंप जळाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
परिसरातील अनेक गावांत जनतेला सध्यातरी टँकरशिवाय पर्याय नसल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले असून एमआयडीसीने टंचाईच्या काळात तात्काळ पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य भारत मुळे यांनी केली आहे. मुधलवाडी वसाहतीची सध्या टँकरच्या पाण्यावर भिस्त अवलंबून असून पाणीपुरवठ्याचे अन्य कोणतेही स्रोत टँकरशिवाय उपलब्ध नाही. टँकरचे पाणी मिळाल्यावरच जनतेची तहान भागते. याकडे एमआयडीसीने लक्ष देऊन टँकरचा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी मुधलवाडीचे सरपंच भाऊ लबडे यांनी केली. (वार्ताहर)
पॉर्इंटवर टँकर रांगा लावून उभे
एमआयडीसीचा पाणीपुरवठा करणारा विद्युत पंप सोमवारी अचानक जळाल्याने आज पाण्याचे टँकर पॉर्इंटवर रांगा लावून उभे आहेत. पैठण एमआयडीसीच्या पंप हाऊसमधून दोन विद्युत पंपाद्वारे औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे एक विद्युत पंप जळाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असून येत्या दोन दिवसांत विद्युत पंप दुरुस्त करून गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या सूत्रांनी दिली; मात्र टँकरवर भिस्त अवलंबून असलेल्या टाकळी (पैठण), मुधलवाडी वसाहत, रहाटगाव, आखातवाडा, नानेगाव, पुसेगाव, खेर्डा तांडा, यासीनपूर, करंजखेडा, पाचलगाव, सोनवाडी बु., सोनवाडी खु., डेरा, रांजणगाव दांडगा, लिंबगाव, सोलनापूर, सायगाव, दादेगाव (नवीन) रजापूर, कुतूबखेडा, दादेगाव बु., हर्षी बु., पाटेगाव, वडाळा, दादेगाव खु. चांगतपुरी, सुलतानपूर, थेरगाव, हर्षी खु., या २९ गावांतील जनतेचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल सुरू असून त्यांच्या नजरा टँकरकडे लागल्या आहेत.