पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:36 IST2019-03-13T23:36:39+5:302019-03-13T23:36:57+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार पदवी परीक्षा १९ मार्च तर पदव्युत्तर परीक्षा २३ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातच विद्यापीठाच्या पुनर्तपासणीचे निकाल, ‘नॅक’कडून २५, २६ आणि २७ मार्चदरम्यान होणाऱ्या मूल्यांकनामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा अंतिम करण्यासाठी परीक्षा मंडळाची बैठक कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१३) पार पडली. या बैठकीत पदवी परीक्षा २७ मार्च आणि पदव्युत्तर परीक्षा ५ एप्रिलपासून सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत उत्तरपत्रिकांच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यात परीक्षा विभागाने शिल्लक उत्तरपत्रिकांचे महाविद्यालयांना केलेल्या वाटपाची आकडेवारी सादर केली. त्यानुसार आतापर्यंत जालना, बीड, उस्मानाबाद येथील परीक्षा केंद्रांना पुरेशा प्रमाणात उत्तरपत्रिकांचे वाटप केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर वाटप करण्यास उत्तरपत्रिकाच शिल्लक नसल्यामुळे चार लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खरेदीची प्रक्रिया खरेदी समितीमार्फतच करण्याची आग्रही मागणी परीक्षा मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी केल्याचे समजते. यामुळे मागील तीन वर्षांपासून १२ ते १३ रुपयांप्रमाणे खरेदी करणाºया उत्तरपत्रिका मागील वेळी निविदा मागवून खरेदी केल्या तेव्हा ८ रुपयांत मिळाल्या होत्या. यावेळीही निविदा प्रक्रियेनेच उत्तरपत्रिकांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
------------