मृग कोरडा आर्द्राकडे डोळे
By Admin | Updated: June 22, 2014 00:25 IST2014-06-22T00:04:46+5:302014-06-22T00:25:18+5:30
भास्कर लांडे, हिंंगोली हमखास पडणाऱ्या पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीक रामभरोसे झाले आहे. पहिल्याच नक्षत्रात पाण्याने दडी दिल्याने लांबलेल्या .
मृग कोरडा आर्द्राकडे डोळे
भास्कर लांडे, हिंंगोली
हमखास पडणाऱ्या पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीक रामभरोसे झाले आहे. पहिल्याच नक्षत्रात पाण्याने दडी दिल्याने लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. परिणामी यंदा उन्हाळाच सरला नसून गतवर्षी यावेळी पेरणी आटोपली होती. पावसाची वाट पहायला लावणाऱ्या स्थितीत उत्पादकांच्या आशा आता रविवारी सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे यंदा ३ लाख ४० हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी ३ लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र कृषी विभागाने निश्चित केले होते. नियोजनानुसार गतवर्षी सारे काही होत गेल्याने उत्पादक आनंदीत होते. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या मानाने हिंगोलीत १२ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा २२ जून उजाडला तरी पावसाचे आगमन झालेले नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. पहिल्यांदा असे पहावयास मिळाल्याचे उत्पादक म्हणाले. एकीकडे हवामान खात्याने यंदा कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. असे असताना ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरविली. पावसाळ्यातील पहिलेच वाहन हत्ती असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अनुमान उत्पादकांनी बांधला होता; पण पहिले वाहन तसेच नक्षत्राने उत्पादकांची निराशा झाली. यंदा पेरणीला उशीर झाल्याने मूग आणि उडीद पीक येण्याची कमीच शक्यता आहे. पेरणीचा कालावधी निघून गेल्याने मूग आणि उडिदाप्रमाणे कापूस उत्पादक चिंताक्रांत झाला आहे. कारण लवकर लागवड केला तर कापसाचे अपेक्षित उत्पादन निघते. जसजसा कापूस लागवडीला उशीर होत जाईल, तसतसे कापसाचे उत्पादन घटत जाण्याची शक्यता आहे. कारण हवामानाचा परिणाम कापसावर होण्याची शक्यता असते. म्हणून उत्पादकांच्या आशा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत; पण या नक्षत्रात मोर वाहन असल्याने अधिक पावसाचा अंदाज बांधता येणार नाही. जरी या चरणात चांगला पाऊस झाला तर ६ जुलैपासून सुरू होणाऱ्या पुनर्वसु नक्षत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज असते. पिके लहान असल्यामुळे मोठ्या पावसाची गरज नसते. तद्नंतर पुष्य २० जुलैपासून सुरूवात होत आहे. तद्नंतर ३ आॅगस्ट रोजी आश्लेषा नक्षत्रास सुरूवात होणार आहे. त्यानंतरच्या मघा नक्षत्रात पावसाची शक्यता कमीच असते. पूढे पूर्वा, उत्तरा या दोन नक्षत्रात पावसाची शक्यता कमीच असते; मात्र यानंतर हळूहळू पाऊस कमी होत जातो. दरम्यान हस्त, चित्रा या नक्षत्रात पावसाची अपेक्षा करता येत नाही. कधी अधिकही पाऊस पडू शकतो तर सर्व चरण कोरडे जावू शकतात. आजघडीला जिल्ह्याची स्थिती बिकट झाली आहे. उत्पादकांनी पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. जवळपास सर्वच कामे आटोपल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिके हातची गेली होती. उलटपक्षी यंदा पावसासाठी उत्पादकांना धावा करावा लागत आहे. आणखीच पाऊस लांबला तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे ३ लाख हेक्टर तर यंदा ३ लाख ४० हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र करण्यात आले निश्चित.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या मानाने हिंगोलीत १२ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा २२ जून उजाडला तरी पावसाचे आगमन झालेले नाही.
हवामान खात्याने यंदा कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला असताना ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्रात पावसाने फिरविली पाठ.
यंदा पेरणीला उशीर झाल्याने मूग आणि उडीद पीक येण्याची कमीच शक्यता असून पेरणीचा कालावधी निघून गेल्याने मूग व उडिदाप्रमाणे कापूस उत्पादक झाला चिंताक्रांत.
हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने जसजसा कापूस लागवडीला उशीर होत जाईल, तसतसा कापसाचे उत्पादन घटत जाण्याची आहे शक्यता.
मागील वर्षी अतीवृष्टी तर यंदा पावसासाठी उत्पादकांना करावा लागत आहे धावा.