दीपावली उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:29 IST2017-10-20T00:29:27+5:302017-10-20T00:29:27+5:30
दीपावलीचा सण गुरुवारी जालना शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला.

दीपावली उत्साहात साजरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवघा आसमंत लक्ष दिव्यांनी उजळून टाकणारा, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, धनसंपत्तीचा वर्षाव करणारा दीपावलीचा सण गुरुवारी जालना शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. नवे कपडे, गोडधोड फराळ, सायंकाळी लक्ष्मीपूजनासाठी झालेली लगबग आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळीचा उत्साह आणखीच द्विगुणित झाला.
घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानामध्ये लक्ष्मीपूजन केले जाणार असल्याने त्याची तयारी सकाळपासूनच सुरू होती. लक्ष्मीपूजनासाठी लागणा-या पणत्या-बोळकी, केरसुणी, केळीची पाने, पाच फळे, महालक्ष्मीची मूर्ती, चोपडी पूजनासाठी लागणाºया खाते वह्या, झेंडूची फुले खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारात गर्दी पाहायला मिळाली.
तर गृहिणींची घरोघरी फराळ तयार करण्यासह सायंकाळच्या लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असल्याचे दिसून आले.
एकूणच दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे वातावरण दिवसभर पाहायला मिळाले. सायंकाळी गृहिणींनी दारासमोर सडा-रांगोळी काढून लक्ष्मी पूजनाची तयारी केली.
आकर्षक आणि विविधारंगी रांगोळ्यांनी अंगण सजल्याचे दिसून आले. सायंकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनासह फटाक्यांचा आतषबाजीचा उत्साह सुरूच होता. दिवाळीनिमित्त शहरातील विविध वस्त्यांमधील इमारती दीपमाळांनी उजळल्या होत्या.