बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात घट
By Admin | Updated: July 31, 2014 00:41 IST2014-07-30T23:44:00+5:302014-07-31T00:41:23+5:30
पाथरी : गोदावरी नदीच्या पात्रावर ढालेगाव आणि मुदगल येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये भर पावसाळ्याच्या दिवसात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्या
बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात घट
पाथरी : गोदावरी नदीच्या पात्रावर ढालेगाव आणि मुदगल येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये भर पावसाळ्याच्या दिवसात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उद्भवणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने गोदाकाठच्या भागामध्ये कायमस्वरुपी सिंचनाची व्यवस्था होईल, यासाठी पैठणपासून बाभळीपर्यंत कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभारले. पाथरी तालुक्यात ढालेगाव आणि मुदगल येथील बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन पाणी आडले गेले तर तारुगव्हाणच्या बंधाऱ्याचे काम सध्या सुरू आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये ढालेगाव आणि मुदगल हे दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. या दोन्ही बंधाऱ्याच्या कार्यक्षेत्रात परभणी व बीड जिल्ह्यातील १५ कि.मी. बॅकवॉटर या परिसरात निर्माण झाले. यामुळे गोदाकाठच्या गावचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला खरा, परंतु यावर्षी पाऊसच पडला नसल्याने बंधाऱ्यातील पाणीपातळीमध्ये घट झाली आहे.
पाथरी शहराला ढालेगाव येथील बंधारा कार्यक्षेत्रातील रामपुरी रत्नेश्वर येथून पाणीपुरवठा होतो. पाणी कमी झाल्याने आगामी काळात पाथरी शहराच्या पाणी प्रश्नावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्याच बरोबर गोदाकाठच्या गावात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने सिंचनावरही परिणाम जाणवू लागला आहे. (वार्ताहर)
पाणीपातळीतही घट
गोदावरी नदीच्या पात्रातील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडण्याच्या स्थितीत असताना आता गोदाकाठच्या भागातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट जाणवू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनावरही परिणाम दिसून येत आहे.