बचत गटांना उतरती कळा
By Admin | Updated: August 14, 2014 02:08 IST2014-08-14T02:01:53+5:302014-08-14T02:08:09+5:30
विजय चोरडिया, जिंतूर महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या बचत गट चळवळीला जिंतूर तालुक्यात अखेरची घरघर लागली आहे.

बचत गटांना उतरती कळा
विजय चोरडिया, जिंतूर
महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या बचत गट चळवळीला जिंतूर तालुक्यात अखेरची घरघर लागली आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील ५०० पेक्षा जास्त गट बंद पडले आहेत. याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात ६७५ बचत गट आहेत. त्यापैकी ११४ गट अनियमित असून १९० गट बंद पडले आहेत. हा आकडा शासकीय असला तरी बंद पडलेल्या गटांची संख्या ३५० च्या घरात आहे. २७१ चालू गटापैकी १७० गटांना विविध बँकांनी वित्त पुरवठा केला आहे. १७० पैकी १५० बचत गट सक्षम असून वेगवेगळ्या उपक्रमातून आपली आर्थिक उन्नती ते करीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने मागील चार ते पाच वर्षापासून बचत गट चळवळ जोमाने सुरू आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून या चळवळीला फारसे वित्तीय सहाय्य बँकांकडून मिळत नाही. म्हणूनच की, काय? अनेक बचत गट नावालाच उरले आहेत.
शहरी भागामध्ये १११ बचत गटांची नगरपालिकेकडे नोंदणी आहे. त्यापैकी ७५ बचत गट चालू असून साधारणत: ३० ते ३५ बचत गट बंद अवस्थेत आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या बचत गटांपैकी ५२ बचत गटांना वित्तीय संस्थांनी कर्ज पुरवठा केला आहे. यापैकी २० ते २५ बचत गट सक्षमपणे शहरी भागामध्ये कार्यरत आहेत.
शहरी भागामध्येही बचत गटांची संख्या फुगलेली दिसत आहे. प्रत्यक्षात बचत गटाला ज्या पद्धतीने चालना मिळायला हवी तशी मिळत नाही. परिणामी अनेक बचत गट बंद अवस्थेत आहेत.
बचत गट चळवळ सक्षमपणे चालली तर महिलांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होता येईल, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच बँकांनी सक्षम बचत गटाला विना प्रयास तात्काळ आर्थिक मदत केल्यास महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने साध्य होईल, असे वाटते.