संभाजी अडकुणे यांच्यावरील कारवाईचा निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 21:07 IST2019-03-01T21:07:33+5:302019-03-01T21:07:46+5:30
लाचेच्या प्रकरणात येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांची विभागीय चौकशी करण्याबाबत, तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

संभाजी अडकुणे यांच्यावरील कारवाईचा निर्णय घ्या
औरंगाबाद : लाचेच्या प्रकरणात येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांची विभागीय चौकशी करण्याबाबत, तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
१३ फेब्रुवारी २०१३ रोजी युनूसखा अजीजखा पठाण यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांच्याविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना कार्यालयाकडे केली होती. तत्कालीन उपअधीक्षक हनुमंत गिरमे यांच्या नेतृत्वाखालील सापळ्यात संभाजी अडकुणे, लिपिक दीपक भोसले व अॅड. अनिल पाटणी हे अडकले होते. २२ फेब्रुवारी २०१३ रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकेनंतर या प्रकरणात अडकुणे यांना जामीन मिळाला. नियमाप्रमाणे अडकुणे यांना निलंबित करून विभागीय चौकशी करणे अपेक्षित असताना, त्यांच्यावर कारवाई न करता लिपिक दीपक भोसले यांना निलंबित करण्यात आले. त्याचप्रमाणे अडकुणे यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास शासनाने परवानगीही नाकारली होती. म्हणून या विरोधात अॅड. युवराज बारहाते यांच्यामार्फ त खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीनंतर खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले.