डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू !

By Admin | Updated: June 15, 2014 00:58 IST2014-06-15T00:24:57+5:302014-06-15T00:58:17+5:30

उमरगा : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला

Death of woman due to negligence of doctors | डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू !

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू !

उमरगा : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असून, संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेदवाईकांनी केल्यामुळे तर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या आरोग्य संघटनेच्या मागणीमुळे शहरातील आरोग्य क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत तुरोरी येथील विजयकुमार लक्ष्मण भोसले यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. तुरोरी येथील सुजाता बाळासाहेब भोसले यांना २० मे रोजी येथील ख्याडे, महामुनी रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.
शस्त्रक्रियेपूर्वी सुजाता भोसले यांच्या शस्त्रक्रियेसाठीच्या संपूर्ण चाचण्या डॉक्टरांनी केल्या होत्या. असे असतानाही शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. दरम्यानच्या कालावधीत संबंधित डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला. अस्वस्थ झालेल्या सुजातांना सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना चार दिवसानी त्यांचा मृत्यू झाला. सुजाता भोसलेच्या मृत्यूस संबंधित डॉक्टर जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मयत सुजाताचे दीर भोसले यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. (वार्ताहर)
...तर कारवाईला सामोरे जाणार
दरम्यान, याप्रकरणी येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. सुजाता भोसले यांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरीरात गुंतागुंत झाली. यावेळी योग्य तो उपचार डॉक्टरांनी सुरु केला. पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले. तेथे चार दिवसांनी मृत्यू झाला. या एकूणच प्रकरणाचा राग मनात धरुन काही अज्ञात नागरिक डॉक्टरांना मानसिक त्रास देवून रुग्णालयात हुज्जत घालत आहेत. त्यामुळे येथील डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालानंतर होणाऱ्या कारवाईस संबंधित डॉक्टर सामोरे जाण्यास तयार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एस. थिटे आदींसह डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Death of woman due to negligence of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.