ट्रकखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: December 16, 2014 01:08 IST2014-12-16T01:01:12+5:302014-12-16T01:08:56+5:30
औरंगाबाद : शाळा सुटल्यानंतर सायकलवर घराकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक लागल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.

ट्रकखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू
औरंगाबाद : शाळा सुटल्यानंतर सायकलवर घराकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक लागल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पारधेश्वर- पळशी तांडा रोडवर घडली. अपघातानंतर ट्रकही उलटला. तसेच नागरिकांनी ट्रकचालकास पकडून बेदम चोप दिला.
लहू गोविंद राठोड (१३, रा. पळशी तांडा, औरंगाबाद) असे त्या मुलाचे नाव आहे. लहू हा पारधेश्वर विद्यालयात आठवी वर्गात शिक्षण घेत होता.
दररोज तो तांड्याहून शाळेला सायकलने जात होता. नित्याप्रमाणे आज साडेचारच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर लहू मित्रांसोबत सायकल घेऊन घराकडे जाण्यासाठी निघाला. शाळेपासून काही अंतरावर समोरून सुसाट वेगाने आलेला हायवा ट्रक (क्र. एमएच- २०- सी टी- ६२४०) सरळ लहूच्या सायकलवर धडकला. ट्रक लहूच्या अंगावरून गेला. त्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याकडेला जाऊन शेतात उलटला.
हा प्रकार पाहून आसपासचे नागरिक धावत घटनास्थळी आले. संतप्त नागरिकांनी ट्रकचालक किशोर नारायण हिवाळे (रा. बेगमपुरा) याला पकडून बेदम चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याच्या सहायक निरीक्षक प्रिया थोरात घटनास्थळी दाखल झाल्या.
त्यांनी तातडीने ट्रकचालकास ताब्यात घेतले आणि लहूचे प्रेत घाटीत रवाना केले. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.