तुळजापूर : मागील भांडणाची कुरापत काढून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ५४ वर्षीय शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील जवळगा (मे) येथे घडली असून, याप्रकरणी दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील जवळगा (मे) येथील शेतकरी सुधाकर मारूती वाघ (वय ५४) मंगळवारी रात्री शेताकडे राखण करण्यासाठी जात होते. यावेळी रस्त्यात भुजंग नागू वाघ व त्याचा मुलगा अमर भुजंग वाघ यांनी मागील भांडणाची कुरापत काढून सुधाकर वाघ यांना काठीने व दगडाने जबर मारहाण केली. यावेळी सुधाकर वाघ यांचा मुलगा प्रभाकर हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यांनाही काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. घटनेनंतर सुधाकर वाघ यांना तातडीने उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रभाकर वाघ यांच्या फिर्यादीवरून भुजंग वाघ व अमर वाघ यांच्याविरूध्द भादंवि कलम ३०२, ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सपोनि जाधव करीत आहेत. मयत सुधाकर वाघ यांच पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. दरम्यान, याच प्रकरणात भुजंग वाघ यांनीही फिर्याद दाखल केली आहे. यात सुधाकर वाघ व प्रभाकर वाघ यांना तुम्ही न सांगता कडबा का नेता, अशी विचारणा केली असता या दोघांनी मारहाण केल्याचे भुजंग वाघ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून या दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)