रांजणगावात मारहाणीत गंभीर जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:33+5:302021-01-08T04:08:33+5:30

आठवडाभरापूर्वी दोन गटात उडाली होती चकमक वाळूज महानगर : रांजणगावात आठवडाभरापूर्वी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी बबन ...

Death due to serious injuries in Ranjangaon | रांजणगावात मारहाणीत गंभीर जखमीचा मृत्यू

रांजणगावात मारहाणीत गंभीर जखमीचा मृत्यू

आठवडाभरापूर्वी दोन गटात उडाली होती चकमक

वाळूज महानगर : रांजणगावात आठवडाभरापूर्वी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी बबन ऊर्फ बबड्या मासोळे (३४, रा.रांजणगाव) याचा सोमवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आज मंगळवारी मयत बबन ऊर्फ बबड्या मासोळे याच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

येथील शेख अक्तर या टपरीचालकास संतोष मासाळे याने ५०० रुपयाचा हप्ता मागितल्यावरून शुक्रवारी (दि. २५) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास वाद झाला होता. या वादावादीनंतर संतोष व त्याच्या साथीदारांनी शेख अक्तर व त्याचा मित्र तौसिफ शेख या दोघांना मारहाण करून फरार झाले होते. या मारहाणीनंतर संतप्त झालेल्या शेख अक्तर याने साथीदाराच्या मदतीने मध्यरात्री संतोष मासोळे याच्या घरावर हल्ला केला होता. या हल्यात सखाराम शिरोळे, अर्जुन गुर्जर, संजू धोत्रे, बबन ऊर्फ बबड्या सखाराम मासोळे, अमृत पुंडलिक गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर गंभीर जखमी बबन ऊर्फ बबड्या मासोळे यांची प्रकृती ढासळल्याने नातेवाइकांनी त्यास पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बबन ऊर्फ बबड्या मासोळे याची प्राणज्योत मालविली.

पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

दोन गटात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी बबन ऊर्फ बबड्या याचा मृत्यू झाल्याने रांजणगावात रात्रीपासूनच तणावाचे वातावरण होते. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी रांजणगावात तगडा बंदोबस्त लावला होता. आज मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयत बबन ऊर्फ बबड्या मासोळे यांच्यावर पोलीस बंदोबस्तात गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

----------------------------

Web Title: Death due to serious injuries in Ranjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.