अजिंठा लेणी रस्त्यासाठी नोव्हेंबरअखेरची डेडलाइन; गडकरींचे जुने ट्वीट व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा
By विकास राऊत | Updated: November 1, 2025 18:45 IST2025-11-01T18:40:20+5:302025-11-01T18:45:02+5:30
विदेशी पर्यटक सोशल मीडियातून या रस्त्याबाबत खेद व्यक्त करतात.

अजिंठा लेणी रस्त्यासाठी नोव्हेंबरअखेरची डेडलाइन; गडकरींचे जुने ट्वीट व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा
छत्रपती संभाजीनगर : येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर बदनाम होत असल्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत पाच ठिकाणी रखडलेले काम पूर्ण होईल, असा दावा सा. बां. विभागाने केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याबाबत केलेले जुने ट्वीट व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली.
विदेशी पर्यटक सोशल मीडियातून या रस्त्याबाबत खेद व्यक्त करतात. शहरातील सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते अजिंठा लेण्यांपर्यंतच्या सुमारे ९५ किमी अंतराच्या रस्त्यापैकी सुमारे २० किमीमधील कामही अर्धवट आहे.
२०१५ ते २०२० या पाच वर्षांत या रस्त्याची दोनदा डागडुजी केली. २०२० पासून १ हजार कोटींतून सिमेंट काँक्रीटीकरणातून रस्त्याचे काम सुरू केले. २०२५ साल संपत आले असून, अजूनही रस्त्याचे काम सुरूच आहे. ६३ कोटींतील सिल्लोड शहरातील ६.२ किमी निल्लोड, ७ किमी हर्सूल, १ किमी पालोद, अजिंठा पुलाचे काम बाकी आहे. यातील निल्लोड ते सिल्लोडपर्यंतचे काम ७ किमीचे धुळे सा.बां.कडे आहे.
शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचे काय?
अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या हर्सूल ते फर्दापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफच्या चौपदरीकरणादरम्यान असलेल्या हर्सूल गावातील मालमत्तांची पाडापाडी करून रस्ता मोकळा केला. परंतु रस्त्यालगत असलेल्या कब्रस्तानाच्या स्थलांतराचा प्रश्न कायम आहे. रस्त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे जागा मागितली होती. परंतु त्यांनी जागा दिली नाही. मग कब्रस्तानच्या जागेचा पर्याय समोर आला. जागा मिळेपर्यंत सध्या १० मीटर रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. तर वसंतराव नाईक चौक ते हर्सूलपर्यंतचे कामही संथपणे सुरू आहे.
पाच वर्षांत ७० किमी काम
रोज ३ किमी काँक्रीट रस्ते बांधण्याचा दावा करणारी यंत्रणा ५ वर्षांपासून ९५ किमी पैकी ७० किमी रस्ता बांधू शकली आहे. कंत्राटदाराची क्षमता १२० टीपीएच, ३० हजार क्युबिक मीटर दरमहा काँक्रीटीकरणाची असतानाही कामाला विलंब झाला. या क्षमतेच्या कंत्राटदाराकडून दरमहा १३ किमी रस्ता बांधणी अपेक्षित असते. लांबी, रुंदी, जागा, वाहतूक याचा विचार होऊन रस्त्याचे काम होते. या क्षमतेचा विचार केला, तर साधारणत: तीन महिन्यांत रस्ता व आठ महिन्यांत पुलांचे काम होणे शक्य आहे. वर्षभरात रस्ता पूर्ण होण्याऐवजी पाच वर्षे लागली.
नोव्हेंबरअखेरपर्यंत काम होईल
नोव्हेंबरअखेरपर्यंत शिल्लक राहिलेले काम पूर्ण करू. त्यासाठी कामाचे टप्पे ठरविले आहेत. निल्लोड ते सिल्लोडपर्यंतचे ७ किमीचे काम धुळे सा.बां.कडे आहे. सिल्लोड शहरातील ६.२ किमी, निल्लोड ते भवन फाट्यापर्यंतचे काम, १ किमी पालोदपर्यंतचे काम नोव्हेंबरअखेरपर्यंत संपेल. अजिंठा पुलाचे काम पावसाळ्यामुळे बाकी आहे.
- एस. एल. गलांडे, कार्यकारी अभियंता, सा. बां.
पर्यटन कसे वाढेल?
अनेक वर्षांनंतरही, २,३०० वर्षे जुने युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांकडे जाणारा रस्ता अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. जर हा रस्ता दुर्लक्षित राहिला तर पर्यटन कसे वाढेल?
-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’