‘डीसीसी’चे अधिकारी पुन्हा थकबाकीदारांच्या दरात

By Admin | Updated: April 28, 2015 00:29 IST2015-04-28T00:22:58+5:302015-04-28T00:29:09+5:30

उस्मानाबाद : आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिगर कर्जदारांकडील थकीत कर्जवसुलीसाठी सोमवारीही शहरातील

The DCC officials are again in default | ‘डीसीसी’चे अधिकारी पुन्हा थकबाकीदारांच्या दरात

‘डीसीसी’चे अधिकारी पुन्हा थकबाकीदारांच्या दरात


उस्मानाबाद : आर्थिक अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिगर कर्जदारांकडील थकीत कर्जवसुलीसाठी सोमवारीही शहरातील सहा थकबाकीदारांचे घर गाठले़ ठिकठिकाणी ठिय्या मांडणाऱ्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हाती कर्जवसुलीचे केवळ ५०० रूपये पडले़ दरम्यान, बिगर शेतीच्या थकीत कर्जदारांनी लवकरच कर्ज भरले नाही तर त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली़
एकीकडे जिल्हा बँकेच्या तिजोरीत पैशांचा खडखडाट आहे़ तर दुसरीकडे हजारो ठेवीदारांच्या मुला-मुलींचे लग्न असल्याने त्यांनी पैशासाठी बँकेत चकरा मारण्यास सुरूवात केली आहे़ काहींनी विनंती करून पैशाची मागणी सुरू ठेवली असून, काहींनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत, प्रसंगी अधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचे प्रकार सुरू केले आहेत़ ठेवीदारांची आक्रमक भूमिका पाहता बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता बिगर शेतीचे थकीत कर्ज वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे़ जिल्ह्यातील २०८ संस्थांकडे बिगर शेतीचे १३३ कोटी ४० लाख रूपयांचे कर्ज वसूल होणे बाकी आहे़ या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत भुसारे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच शहरातील ९ थकबाकीदारांच्या घरावर मोर्चा काढून, ठिय्या मांडला होता़ दिवसभरात केवळ २५ हजार रूपये या पथकाच्या हातावर पडले होते़ रविवारच्या सुटीनंतर सोमवारी सकाळीच बँकेतील जे़आऱसुपेकर, आऱडीग़ोरे, शाखाधिकारी विनोद लावंड, एऩआऱपडवळ, वसंत सुरवसे, ए़एमक़पाळे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने थकीत कर्जवसुलीसाठी मोहीम सुरू केली़ यात तुळजाभवानी मजूर सहकारी संस्थेकडे असलेले ४ लाख ९८ हजार १३४ रूपये वसूल करण्यासाठी बाळासाहेब जाधव यांच्याकडे, जीवनराव गोरे पतसंस्थेकडील थकीत १ लाख रूपये वसुलीसाठी चेअरमन मगरे यांच्याकडे, स्वामी विवेकानंद मजूर संस्थेकडे थकीत असलेल्या ४ लाख ९५ हजार रूपये वसुलीसाठी कानिफनाथ देवकुळे यांच्याकडे, तुळजाभवानी महिला औद्योगिक सहकारी संस्थेकडील थकबाकीसाठी शिला उंबरे यांच्या घराकडे, साई मजूर संस्थेकडील थकीत १ लाख ५२ हजार रूपये वसुलीसाठी सुनिल काळे यांच्या घराकडे, निळकंठेश्वर मजूर संस्थेकडील थकीत वसुलीसाठी सारोळा येथील श्रीमंत गायकवाड यांच्याकडे या पथकाने धडक मारली़ यावेळी केवळ कानिफनाथ देवकुळे यांनी पथकाच्या हातावर ५०० रूपये टेकविले़ तर श्रीमंत गायकवाड यांनी ६० हजार रूपये एक तारखेपर्यंत भरण्याचे आश्वासन दिल्याचे बँककडून सांगण्यात आले़(प्रतिनिधी)

Web Title: The DCC officials are again in default

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.