लसीकरण मोहिमेची तारीख लवकरच जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:35+5:302021-01-08T04:07:35+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात दोन टप्प्यांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, मोहिमेची तारीख शासन स्तरावरून लवकरच जाहीर होणार ...

लसीकरण मोहिमेची तारीख लवकरच जाहीर होणार
औरंगाबाद : जिल्ह्यात दोन टप्प्यांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, मोहिमेची तारीख शासन स्तरावरून लवकरच जाहीर होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना लसीकरण जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यंत्रणेला सूचना केल्या.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, लसीकरणासाठी सर्वांची पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी केलेल्यांना लसीकरणाची वेळ, ठिकाण, दिनांक याबाबतची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारा देण्यात येईल. जिल्ह्यात लसीकरणासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात येत असून, शासनस्तरावरून लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी तालुका स्तरावर चोख नियोजन ठेवावे. लसीरण केंद्रांमधील सर्व आवश्यक सुविधा, स्वच्छता, पूरक बाबींची व्यवस्था यासह पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ, लसीकरण पथकांची नियुक्ती करावी. सर्व संबंधितांना पूर्व प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष लसीकरण संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. तसेच लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे सूचित केले. मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जि. प. सीईओ मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डॉ. एस. शेळके, डॉ. वाघ, डॉ. मुजीब, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.
केंद्रावरील पथके प्रशिक्षणासह सज्ज ठेवा
जिल्ह्यात दोन टप्प्यांत कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून, लसीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात येणारी पथके प्रशिक्षणासह सज्ज ठेवावीत, असे जिल्हाकिाऱ्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त म्हणाले,
बैठकीत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, गेले वर्षभर सर्वजण युद्धपातळीवर कोरोना विषाणू विरोधात लढा देत आहोत. या लढाईतल्या महत्त्वाच्या वळणावर आपण आलेलो आहोत. यात सर्वांची भूमिका महत्त्वाची असून, पोलीस विभाग या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल. सर्वांनी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.