राजीनाम्यासाठी ‘तारीख पे तारीख’
By Admin | Updated: November 5, 2016 01:40 IST2016-11-05T01:24:00+5:302016-11-05T01:40:10+5:30
औरंगाबाद : भाजपला महापौरपद सहजासहजी मिळू नये यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडून वेगवेगळे डावपेच आखण्यात येत आहेत.

राजीनाम्यासाठी ‘तारीख पे तारीख’
औरंगाबाद : भाजपला महापौरपद सहजासहजी मिळू नये यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडून वेगवेगळे डावपेच आखण्यात येत आहेत. ५ नोव्हेंबरला राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे कालपर्यंत भाजपला सांगण्यात येत होते. सेनेवर विश्वास ठेवून भाजपही सबुरीने प्रकरण हाताळत आहे. शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी मनपाची सर्वसाधारण सभा १९ नोव्हेंबरला घेण्यात येत असल्याचे जाहीर करून टाकले. त्यामुळे भाजपला आणखी १४ दिवस राजीनाम्यासाठी वाट पाहवी लागणार आहे.
३१ आॅक्टोबर रोजी विद्यमान महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ संपला. मात्र, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दिवाळीचे कारण दिले. त्यामुळे दिवाळीनंतर राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दिवाळी संपताच सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर औरंगाबादेत येणार असल्याचेही जाहीर केले होते. ५ नोव्हेंबरला राजीनाम्यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे भाजपला कळविण्यात आले. शुक्रवारी दुपारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी १९ नोव्हेंबरला सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेनंतर महापौर, उपमहापौर राजीनामा देतील, असे संकेत मिळत आहेत. १९ नोव्हेंबरला त्र्यंबक तुपे, प्रमोद राठोड यांनी राजीनामे दिल्यानंतर महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे, निवडणुकीची तारीख निश्चित करणे यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या करारानुसार यंदा भाजपला फक्त १२ महिन्यांसाठी महापौरपद देण्यात येणार आहे. त्यातही एक महिना राजीनामानाट्यात घालविला तर भाजपला कामकाजासाठी फक्त ११ महिनेच मिळणार आहेत. शिवसेनेच्या या खेळीमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. युतीधर्मानुसार मित्रपक्ष वागत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्या या खेळीला भाजपामधील काही मंडळींचा मुक पाठींबा असल्याचे दिसून येत आहे. पक्षातील ही मंडळी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले की, महापौरांनी सर्वसाधारण सभा १९ नोव्हेंबरला आयोजित केली असली तरी शनिवारी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यासोबतच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. आम्ही अत्यंत आशादायी आहोत. सेना दिलेला शब्द नक्की पाळणार हे निश्चित.
महापालिकेत सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी ४ दिवस अगोदर विषयपत्रिका काढण्यात येते.
४१९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका शुक्रवारीच काढण्यात आली.
४विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभांचे इतिवृत्तही दडवून ठेवण्यात आले आहेत.
४ मागील सर्वसाधारण सभेत ऐनवेळी अनेक ठराव मंजूर करण्यात आले. हे ठराव कोणते होते हे नगरसेवकांनाही माहीत नाही.