दारणा, गंगापूर धरणांतून ६५०० क्युसेक्सचा विसर्ग
By Admin | Updated: August 1, 2016 00:06 IST2016-07-31T23:52:01+5:302016-08-01T00:06:51+5:30
औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

दारणा, गंगापूर धरणांतून ६५०० क्युसेक्सचा विसर्ग
औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल.
गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. तर वरच्या भागातील २१ धरणांमध्ये सरासरी ५२ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा झाला आहे. तरीही आतापर्यंत वरच्या भागातून जायकवाडीत पाणी आलेले नाही. उलट पालखेड, मुळा, नांदूर-मधमेश्वर या वरच्या भागातील प्रकल्पाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. अजूनही तीन धरणांचे कालवे सुरूच आहेत; परंतु आता दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वरच्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी १० वाजेपासून दारणा धरणातूनही अडीच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नंतर तो सायंकाळी ४ वाजता पाच हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला.
परंतु सायंकाळी पुन्हा तो ३९५० क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. हे पाणी गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने येत आहे. ते दोन दिवसांत जायकवाडीत दाखल होण्याची शक्यता असल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या जायकवाडीत वरच्या भागातून केवळ ७२० क्युसेक्सने पाणी दाखल होत आहे. मात्र, आता दारणा आणि गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढणार आहे. दोन दिवसांत ही आवक सुमारे अडीच हजार क्युसेक्सपर्यंत जाऊन जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल, अशी आशाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
२० दलघमीची गरज
जायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. या धरणाची मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. महिनाभरात जायकवाडीत २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.