सणासुदीतच काळोख
By Admin | Updated: August 9, 2014 00:24 IST2014-08-08T23:51:12+5:302014-08-09T00:24:28+5:30
जालना : जुना व नवीन जालन्यातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने थकबाकीचेनिमित्त दाखवून पुन्हा खंडित केल्यामुळे श्रावण महिन्यात

सणासुदीतच काळोख
जालना : जुना व नवीन जालन्यातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने थकबाकीचेनिमित्त दाखवून पुन्हा खंडित केल्यामुळे श्रावण महिन्यात सणासुदीच्या काळातच संपूर्ण शहर पुन्हा काळोखात बुडाले आहे.
उद्योग नगरी म्हणून ओळखले जाणारे हे शहर काही महिन्यांपूर्वीपर्यंत एक ते दीड वर्ष काळोखात होते. पालिका प्रशासनाने अथक प्रयत्न करुन सुद्धा महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत केलाच नाही. थकित रक्कम भरा तरच वीजपुरवठा करु अशी भूमिका घेतली. अखेर पालिकाविरुद्ध महावितरणच्या शीतयुद्धाने संघर्षाचे स्वरुप घेतल्यानंतर अभय योजनेतून पालिकेस सवलत बहाल करण्यात आली. त्यातून सात कोटीपैकी १ कोटी ८० लाखांचा पहिला हप्ता पालिकेने मार्च - एप्रिल महिन्यात अदा केला. तेव्हा पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. आता पुढील हप्त्याचा प्रश्न उभा राहिला आहे. ती देयके द्यावीत कोठून असा सवाल पालिकेने केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पथदिव्यांचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केला. पाठोपाठ पाणीपुरवठा योजनेचाही पुरवठा खंडित केला. त्यामुळे आता नव्याने प्रश्न उभे राहिले आहेत.
पावसाळ्याच्या महिन्यातच जालनावासियांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार असे चित्र आहे. त्यातच बंद पथदिव्यांमुळे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. शहरातील रस्ते, चिखलमय झाले आहेत. झोपटपट्ट्यांमधून व नवीन वसाहतींमधून रस्त्यावरुन ये- जा करणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच आता बंद पथदिव्यांमुळे या रस्त्यावरुन रात्री बेरात्री ये- जा कशी करावी अशी चिंता नागरिकांना लागली आहे. सायंकाळी सात नंतरच रस्ते सामसूम होऊ लागले आहेत. जुना व नवीन जालन्यातील या परिस्थितीमुळे नागरिक हादरुण गेले आहेत. (प्रतिनिधी)
श्रावण मास सुरु आहे, म्हणजेच सणासुदीच्या या महिन्यात प्रत्येक कुटुंंबियांत रेलचेल आहे. रक्षाबंधन पाठोपाठ, कृष्णजयंती, पतेती, गणशोत्सव, महालक्ष्मी तोंडावरच आहे. या काळात जुना व नवीन जालन्यातील पथदिवे बंद असणे परवाडणारे नाही. अधीच शहरात छोट्या मोठ्या भुरट्या चोऱ्यांना उधाण आले आहे. त्यातच पावसाळा लांबला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने अडेलतट्टूपणाची भूमिका घेऊ नये असा सूर आहे.
जायकवाडी - जालना योजनेतून शहरापर्यंत पोहचणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापासून टाक्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वीजपंपांना वीजपुरवठा गरजेचा असताना महावितरणने त्या पंपांचाही पुरवठा खंडित करीत पालिकेस कोंडीत पकडले. आता पालिकेने धावाधाव सुरु केली. काही रक्कम अदा करुन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु बंद पथदिव्यांचा प्रश्न कायम राहील, अशी चिन्हे आहेत. पालिकेने दुसरा हप्ता भरावयास असमर्थता दाखविली आहे.