पारगावात भीषण पाणीटंचाई !
By Admin | Updated: August 1, 2014 00:28 IST2014-08-01T00:08:58+5:302014-08-01T00:28:19+5:30
पारगाव : अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकही दमदार पाऊस पडलेला नाही.

पारगावात भीषण पाणीटंचाई !
पारगाव : अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकही दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाई अधिक भीषण रूप धारण करू लागली आहे. सध्या दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात आहे. मात्र, या पाण्यावर ग्रामस्थांची तहान भागत नसल्याने मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. जनावरांच्या नशिबी तर पायपीट कायम आहे.
तीन वर्षांपासून परिसरात सरासरीपेक्षा अत्यल्य पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाळा आला करी पाणी टंचाईचे संकट दत्त म्हणून उभे रहाते. यंदा तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. सध्या दोन टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे. टँकरच्या दिवसाकाठी दोन अशा मिळून सहा खेपा केल्या जात आहेत. परंतु, हेही पाणी कमी पडत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जुलै महिना सरला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जलस्त्रोतांची पाणीपातळी अद्यापि नाही. लहान-मोठे प्रकल्पही कोरडे आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. (वार्ताहर)
कोट्यवधी खर्चूनही योजना निरूपयोगी
पारगावला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरूवातील मांजरा प्रकल्पावरून योजना राबविण्यात आली. परंतु, सध्या या प्रकल्पामध्येच पाणी नसल्याने ही योजना बंद आहे. दरम्यान, प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हाच अनुभव येत असल्याने जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून हातोला तलाव क्षेत्रामध्ये विहीर खोदून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. याही योजनेवर कोट्वधी रूपये खर्च करण्यात आले. परंतु, विहीची पाणीपातळी खालावल्याने सदरील योजनेचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्रामस्थांना या योजनेच्या बाबतीत असून ‘अडचण, नसून खोळंबा’ या म्हणीचा प्रत्येय येत आहे.
कोवळ्या पिकांचे नुकसान
अत्यल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु, एकही मोठा पाऊस झाला नसल्याने सदरील पिकांची वाढ खुंटली आहे. हरणांनीही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून त्याच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.