काँग्रेससाठी धोक्याची घंटा
By Admin | Updated: May 18, 2014 00:48 IST2014-05-18T00:11:24+5:302014-05-18T00:48:34+5:30
लातूर तालुका प्रारंभीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ दिवंगत विलासराव देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने गावागावांत त्यांना मानणार्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे़

काँग्रेससाठी धोक्याची घंटा
लातूर तालुका प्रारंभीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ दिवंगत विलासराव देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने गावागावांत त्यांना मानणार्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे़ त्याच्या निधनाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसची पिछेहाट झाली आहे़ कार्यकर्त्यांमध्ये असलेले हेवेदावे तसेच मी पणाची वृत्ती यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारल्याचे चित्र उघड झाले आहे़ एकंदरीत लातूर तालुक्यातून भाजपाला मिळालेली आघाडी ही काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे़ लातूर तालुक्यात ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, पंंचायत समिती, जिल्हा परिषद आदी जागांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे़ जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या भागात दिवंगत विलासराव देशमुख यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून मतदार जोडले होते़ जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकांत कार्यकर्ते अहोरात्र प्रचारात गुंततात़ मतदारांच्या घरोघरी जाऊन पक्षासाठी मते मागतात़ मात्र लोकसभा निवडणुकीत पदाधिकार्यांचा उत्साह दिसून येत नाही़ मोजके पदाधिकारी नेत्यांसमोर मिरवतात़ मांजरा, विकास, रेणा कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांचे जाळे विणले गेले़ दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत बब्रुवान काळे, आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख यांना मानणारे गट आजही तालुक्यात कार्यरत आहेत़ आपण पक्षासाठी केलेल्या कामाचे श्रेय स्थानिक एकाच पुढार्याला जाईल, यामुळे काहीजण नुसतेच सोबत असतात़ नेत्यांपुढे पक्षनिष्ठा दाखविणार्या अनेक गावपुढार्यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे तालुक्यात भाजपाची सरशी झाली आहे़ निवडणुकीपुरते मतदारांच्या दारात जाऊन भुलविण्याचा प्रयत्न करणार्या पुढार्यांना मतदारांनी हात दाखविला आहे़ मागील लोकसभा निवडणुकीत लातूरनेच काँग्रेसला आघाडी दिल्यामुळे जयवंतराव आवळे यांचा विजय झाला होता़ ग्रामीण मतदासंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे़ भाजपाने विधानसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी तालुक्यात दोन वर्षांपासून काम सुरू केले आहे़ मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात सिंहाचा वाटा असलेल्या तालुक्यात काँग्रेस नेत्यांना आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे़ लातूर तालुक्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गावे पिंजून काढली़ काँग्रेसच्या पुढार्यांकडून होत असलेली मुस्कटदाबी कमी करण्यासाठी भाजपाला मते द्या, अशी विनवणी मतदारांना केली़ मतदार आपल्याच बाजुने असल्याच्या अविर्भावात असलेल्या काँग्रेसच्या स्थानिक पुढार्यांना मतदारांनी चांगलाच धक्का दिला आहे़ गावांगावांत बाजार समिती, साखर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, संजय गांधी निराधार समिती अशा अनेक शासकीय निमशासकीय समित्यांवर पदाधिकारी काँग्रेसचे आहेत़ पदे घेऊन बसलेली मंडळी मतदार आपलेच आहेत, असे वागतात़ फक्त निवडणुका आल्या की खुशाली विचारतात़ बब्रुवान काळे, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ग्रामीण भागातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे़ गावातील गट-तट एकमेकांचे वर्चस्व कमी करण्यासाठी विरोधात काम करतात़ भाजपाला मताधिक्य मिळाल्याने विधानसेभेची तयारी वाढली आहे़