तालुक्यातील अधिकाऱ्यांची दांडी; कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:49+5:302020-12-17T04:29:49+5:30
औरंगाबाद : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी तीन टप्प्यांत मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ...

तालुक्यातील अधिकाऱ्यांची दांडी; कारणे दाखवा नोटीस
औरंगाबाद : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी तीन टप्प्यांत मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्या सर्व दांडीबहाद्दरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावरील नियोजन व अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. लसीकरण मोहिमेची माहिती आरोग्य यंत्रणेद्वारे दिली जाणार आहे. लसीकरणाच्या कामांत बचत गटांच्या सदस्य, लोकप्रतिनिधी, खासगी डॉक्टर, शैक्षणिक विभाग, पोलीस यांच्यासह सर्व संबंधितांचे साहाय्य घेऊन मोहीम जिल्ह्यात यशस्वी करायची आहे. लसीकरण झाल्यानंतर सर्वांनी मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीस अनुपस्थित असलेल्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, डॉ. वाघ जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब आदी उपस्थित होते.
लसीकरण मोहिमेचे तीन टप्पे असे
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सर्वांना लस देण्यात येईल. पोलीस, सुरक्षा रक्षक, होमगार्ड, सॅनिटायझर वर्कर, मनपा यासह प्रत्यक्ष फील्डवर कार्यरत असणाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात तर पन्नास वर्षांवरील सर्व तसेच पन्नाशीच्या आत कोमॉर्बिड असलेल्यांना तिसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. जिल्ह्यातील पात्र, नोंदणी केलेल्या प्रत्येकाला लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. लसीकरणासाठी सर्वांची पूर्वनोंदणी आवश्यक असेल. नोंदणी केलेल्यांना लसीकरणाची वेळ, ठिकाण, तारीख याबाबतची माहिती मोबाईलवर संदेशाद्वारे देण्यात येईल.