डान्स टीचरला गांजा विकताना पकडले, उस्मानुपऱ्यातील मनपा शाळेजवळ कारवाई
By राम शिनगारे | Updated: February 24, 2023 21:12 IST2023-02-24T21:12:45+5:302023-02-24T21:12:53+5:30
उस्मानपुरा भागात सर्वाधिक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेण्यात येतात.

डान्स टीचरला गांजा विकताना पकडले, उस्मानुपऱ्यातील मनपा शाळेजवळ कारवाई
औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांना नृत्य शिकणाऱ्या एका शिक्षकासह त्याच्या साथीदाराला उस्मानपुऱ्यातील सीबीएसई मनपा शाळेजवळ गांजाची विक्री करताना उस्मानुपरा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या दोघांकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.
करण डेव्हिड ॲंथोनी बिजीरा (२७) व आदित्य प्रदीप पंडीत (२५, दोघे रा. भावसिंगपुरा) अशी आरोपीची नावे आहेत. यातील करण डेव्हिड हा विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नृत्य शिकवतो. त्याची आई सुद्धा शिक्षीका आहेत. तर दुसरा आरोपी क्रुझवर कामाला आहे. निरीक्षक बागवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार करण डेव्हिड हा किरकोळ गांजाची विक्री करण्यासाठी सहकाऱ्यासह मनपाच्या शाळेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उस्मानुपरा पोलिसांनी सापळा लावला. गांजा विक्रीसाठी आलेले आरोपी दिसताच त्यांची थांबवून झाडाझडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे गांजा आढळून आला. या दोघांकडून गांजासह ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंमलदार विलास कराळे यांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
उस्मानपुरा भागात सर्वाधिक क्लासेस
उस्मानपुरा भागात सर्वाधिक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेण्यात येतात. या शिकवणी वर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नशेमध्ये ओढले जाऊ शकते. त्यामुळे उस्मानपुरा पोलिस याविरोधात अधिक जागरुकतेने कार्यवाही करीत आहेत. अमली पदर्थाविषयी काेणाला काही संशय आल्यास उस्मानपुरा पोलिसांनी कळवावे, असे आवाहनही निरीक्षक गिता बागवडे यांनी केले.
नारेगावात एनडीपीएस पथकाची कारवाई
नारेगाव परिसरातील जोशी आळी भागात राहणार्या काकासाहेब रंभाजी महापुरे यांच्या घरावर एनडीपीएसच्या पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी रात्री छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार ८८० रूपये किंमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.