घरावर वीज कोसळल्याने नुकसान
By Admin | Updated: April 15, 2015 00:39 IST2015-04-15T00:26:02+5:302015-04-15T00:39:54+5:30
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड येथील शेतवस्तीतील रहिवासी विलास माधवराव गाडेकर यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले

घरावर वीज कोसळल्याने नुकसान
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड येथील शेतवस्तीतील रहिवासी विलास माधवराव गाडेकर यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना १३ एप्रिल रोजी रात्री घडली. सुदैवाने गाडेकर कुटुंबिय अन्य खोलीत झोपलेले असल्याने व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून मदत केल्याने जिवित हानी टळली.
गाडेकर व त्यांचे कुटुंबिय मागील खोलीत झोपलेले होते. या खोलीच्या समोरील बाजूस अवघ्या १५ फुटांवरच रात्रीच्या सुमारास वीज कोसळली. वीज कोसळल्याच्या आवाजाने हे कुटुंबिय पूर्णपणे घाबरले होते. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी पत्रे उचकटून कुटुंबातील सर्व सदस्यांना सुखरूप घराबाहेर काढले. त्यामुळे गाडेकर कुटुंबियांचे प्राण वाचले. मात्र घरातील संसारोपयोगी तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाले.
या घटनेनंतर गाडेकर यांच्या मालकीची बकरीसह घरातील अन्नधान्य, शेती उपयोगी साहित्य, कपडे आदी जळून खाक झाले. त्यामुळे गाडेकर यांचा संसार उघड्यावर पडला आहे. गावातील माधवराव हिवाळे, कारभारी घोलप, सुदामराव गाडेकर, गिण्यादेव गाडेकर, गजानन गाडेकर, गंगाधर घोलप, कडूबा घोलप, राजू गाडेकर, बाबासाहेब गाडेकर, नानासाहेब गव्हाड, कोंडीबा गाडेकर आदींनी या कुटुंबियांचे प्राण वाचविण्यासाठी मदत केली. या घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पी.जी. काळे यांनी १४ एप्रिल रोजी केला. केदारखेडा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वारे व विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू आहे. (वार्ताहर)