‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न नाही
By Admin | Updated: June 15, 2014 00:52 IST2014-06-15T00:37:42+5:302014-06-15T00:52:36+5:30
संजय जाधव , पैठण तब्बल २० वर्षे शिवसेनेचा अभेद्य किल्ला असलेला पैठण विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने नेट लावून पटकावला.

‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न नाही
संजय जाधव , पैठण
तब्बल २० वर्षे शिवसेनेचा अभेद्य किल्ला असलेला पैठण विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने नेट लावून पटकावला. मात्र आगामी निवडणुकीत तो राखणे राष्ट्रवादीला कठीण जाणार आहे. विद्यमान आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या विविध निवडणुकीत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. यानंतरही राष्ट्रवादीकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न न झाल्याने या परिस्थितीचा पुरेपूर फायदा वाघचौरे यांच्या विरोधकांना मिळाला आहे.
२००९ च्या विधानसभेला शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांची चौथी वेळ होती. १५ वर्षांच्या काळात संदीपान भुमरे यांनी पंचायत समिती, जि.प., साखर कारखाना, खरेदी-विक्री संघ व विविध सहकारातील निवडणुका जिंकून विरोधकांना जेरीस आणले होते. भुमरे यांची मक्तेदारी संपविण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय वाघचौरे यांना बळ दिले. त्यात स्वपक्षातील भुमरे विरोधकांनीही वाघचौरेंना पाठबळ दिले. त्यातच पाण्यासाठी आसुसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे स्वप्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखविले. परिणाम व्हायचा तोच झाला. संदीपान भुमरे पराभूत झाले. राज्यातून शिवसेनेला सातत्याने साथ देणाऱ्या १४ मतदारसंघांपैकी एक असलेल्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे नाव या यादीतून गळाले.
संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला; मात्र हळूहळू राष्ट्रवादीचे मोहरे वाघचौरे यांच्यापासून दुरावत गेले. काँग्रेस पक्षाबरोबर संबंध सुधारण्याऐवजी बिघडण्यावरच भर देण्यात आला. परिणामी २००९ ते आजतागायत झालेल्या निवडणुकीत जि.प., पंचायत समिती, साखर कारखाना, नगर परिषद अशा विविध निवडणुकीतील वाघचौरे यांची कमाई फक्त दोन नगरसेवक आहेत. त्यातील एक आठवडाभरात काँग्रेसवासी झाला.
यामुळे तालुक्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीत आमदार संजय वाघचौरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड हे आहेत. याच वेळेस काँग्रेसने या सर्व निवडणुकीत आलेख उंचावत रामनाथ चोरमले यांच्या रूपाने समाजकल्याण सभापती (जि.प.), बाबासाहेब पवार यांच्या रूपाने पंचायत समिती उपसभापतीपद पटकावले, तर पैठण नगर परिषदेवर एकहाती विजय मिळविला. शिवसेनेने माजी आमदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, संत एकनाथ साखर कारखाना, जिल्हा परिषद, नगर परिषदेत भरीव यश मिळविले. तालुक्यातील महत्त्वाचे पंचायत समिती सभापतीपद मिळविले. तालुक्यात नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती आदी महत्त्वाच्या पदांसाठी हस्तक्षेप करण्याचा अधिकारसुद्धा आ. वाघचौरे यांच्याकडे जनतेने ठेवला नाही.
२०१४ च्या विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसकडून अनिल पटेल, रवींद्र काळे, रामनाथ चोरमले, बाबासाहेब पवार यांचे नाव आघाडीवर असून, रामनाथ चोरमले हे प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रवादीचे अनिल जाधव, अॅड. कांतराव औटे, रवींद्र शिसोदे, बद्रीनारायण भुमरे, अप्पासाहेब निर्मळ यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार संदीपान भुमरे, सोमनाथ परदेशी, विजय जाधव, प्रकाश वानोळे यांची नावे चर्चेत आहेत.