तालुक्यावरून तलाठ्यांचा कारभार
By Admin | Updated: June 27, 2014 00:13 IST2014-06-26T23:16:36+5:302014-06-27T00:13:33+5:30
जालना : लोकमतने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक सज्जे तलाठ्यांविनाच आढळून आले.

तालुक्यावरून तलाठ्यांचा कारभार
जालना : लोकमतने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक सज्जे तलाठ्यांविनाच आढळून आले. बहुतांश तलाठी तालुकास्थानावरून कारभार चालवित असल्याचे धक्कादायक चित्र समारे आले.
वाटूर फाटा : वाटूर फाटा हे गाव दोन तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण. सोयीनुसार या ठिकाणी मंठा तालुक्यातील तीन तलाठी कार्यालये आहेत. त्यात वैद्यवडगाव, पांगरी व सरकटे वझर या सज्जांचा समावेश आहे. तिनही कार्यालयांना गुरूवारी भेटी दिल्या तेव्हा तलाठी साहेब गैरहजर असल्याचे दिसून आले. मात्र, खाजगी कर्मचारी कामात दंग होते. एका तलाठ्याकडे तीन सज्जाचा कारभार असल्याची माहिती हाती आली. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. परतूर तालुक्यातील दोन तलाठी वाटूरफाटा येथूनच काम पाहतात. बाबुलतारा सज्जा अंतर्गत दहिफळ भोंगाणे, वाढोणा सज्जा अंतर्गत श्रीधर जवळा, कंडारी असे तीन गावे असे मिळून सहा गावांच कार्यभार यांच्याकडे आहे. तर वाटूर, एदलापूर, पिंपरखेडा ही तीन गावे अन्य एका तलाठ्याकडे आहेत. त्यांचा मोबाईल नेहमी बंद राहतो
रोहिलागड : अंबड तालुक्यातील सज्जाचे हे ठिकाण. ५ हजार एवढी गावची लोकसंख्या. परंतु सज्जास्थानी तलाठी फिरकतच नाही. २२ कि़मी. अंतरावरील अंबड येथील स्वत:च्या निवास्थानातूनच तलाठी महाशय गावगाडा सांभाळतात. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात फेरफटका मारला.
तेव्हा १५ ते २० ग्रामस्थ ‘साहेबां’च्या प्रतीक्षेत होते. साहेब काही आलेच नाहीत... मोबाईल सुरू होता... अंबडला या... असा निरोप दिला जात होता. प्रत्येक कामाकरिता ग्रामस्थांना अंबडला घरी किंवा तहसीलमध्ये धाव घ्यावी लागते.
एखाद्या एजंटांशी संपर्क केल्यानंतरच काम फत्ते होते, असा सर्रास अनुभव येथील ग्रामस्थांना आहे.
तळणी : तळणी, दुधा, उस्वद, शिरपूर या सजाचे काम तळणी सजातून चालते. बहुतांश तलाठी गावात येत नसल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असून, तलाठी शक्यतो मंठ्यावरुच कारभार पाहतात.
तलाठ्यांनी सजावर येऊन शेतकऱ्यांचा कामाचा निपटारा करावा, असा नियम असला तरी बहुतांशी तलाठी मंठा येथेच या आज मिटिंग आहे आज ट्रेनिंग आहे असे सांगून शेतकऱ्यांनाच मंठा येथे बोलविले जात असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तालुकास्थानी जाऊनही शेतकऱ्यांची कामे होतील याशी शाश्वती नसते. सज्जावर थांबणे तलाठ्यांना बंधनकारक करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)