जिल्ह्यातील ग्राहकांनो, आता ताकही प्या फुंकूऩ़़
By Admin | Updated: May 22, 2014 00:30 IST2014-05-22T00:22:44+5:302014-05-22T00:30:39+5:30
नांदेड : जेवणानंतर ताक प्यावे, सायंकाळी दूध प्यावे आणि सकाळी पाणी प्यावे़ दररोज हे केलयाने तुमच्या अनेक तक्रारी कमी होतील़

जिल्ह्यातील ग्राहकांनो, आता ताकही प्या फुंकूऩ़़
नांदेड : जेवणानंतर ताक प्यावे, सायंकाळी दूध प्यावे आणि सकाळी पाणी प्यावे़ दररोज हे केलयाने तुमच्या अनेक तक्रारी कमी होतील़ यात ताकाला सर्वाधिक मागणी असते ती उन्हाळ्यात़ थंडगार मसालेयुक्त ताकाचा स्वाद घेण्यासाठी शहरातील हॉटेलांपासून ते रस्त्यावर थाटलेल्या ठेल्यावर ग्राहकांच्या गर्दीचे कोंडाळे पहायला मिळते़ मात्र आपण भेसळयुक्त ताक तर पीत नाही ना याची दक्षता प्रत्येकाने जरूर घ्यायला हवी़ बाजारात ग्राहकांच्या गरजेचा गैरफायदा घेणार्या विक्रेत्यांकडून कृत्रिमरित्या तयार केलेल्या ताकाची सर्रास विक्री केली जात असताना, अन्न व औषध प्रशासन मात्र डोेळे मिटल्यागत निश्चिंत आहे़ ग्राहकांना मात्र खरोखरच शब्दश: ताक फुंकून पिण्याची वेळ आली आहे़ गाईचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकापासून काढलं लोणी, खाल्लं कोणी? असे गाणे जुन्या पिढीतल्या आजीबार्इंच्या मुखातून ऐकण्यात आले असेल़ घरच्या घरी दही घुसळून ताक बनविण्याची पद्धत पूर्वी पहायला मिळायची़ ताक बनवायचे असेल तर आदल्या दिवशी दुधात विरजण घालून दही बनण्याची प्रक्रिया पार पाडली जायची़ आणि दही घुसळले की ताक तयार व्हायचे़ घुसळून केलेले ताक कमी चिकट असते़ मात्र आता घरच्या घरी ताक बनविण्याची प्रक्रिया जवळपास कालबाह्य होत चालली असून पिशवीतून मिळणारे तयार ताक खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे़ सध्या उन्हाळ्यामुळे शहरात ठिकठिकाणी ताक-लस्सीची दुकाने थाटलेली दिसून येत आहेत़ दहा ते पंधरा रुपयांपर्यंत हे ताक विविध प्रकारांत उपलब्ध आहे़ बाजारात ताकाची भुकटीही उपलब्ध आहे़ ताकाला रंग येण्यासाठी धंदेवाईक विक्रेत्यांकडून दह्यात बटरचे काप मिसळले जातता़ ताकातला आंबटपणा नियंत्रित ठेवण्यासाठीही काही रासायनिक पदार्थाचा वापर केला जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत़ घरी बनविलेले ताक आणि कृत्रिमरित्या तयार केलेल्या ताकाच्या चवीत तफावत आढळून येते़ या कृत्रिम भेसळयुक्त ताकामुळे तृष्णा शमविली जाऊ शकेल, पण त्याच्यापासून आरोग्याला फायदा होण्याऐवजी धोकाच अधिक आहे़ त्यामुळे ग्राहकांवर खरोखरच ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. ताक पौष्टीक पेय ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टक पेय आहे़ ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजे तसेच क जीवनसत्व असते़ लॅक्टिक अॅसिडबरोबरच लोहाचेही प्रमाण असते़ शंभर ग्रॅम ताकामध्ये ९० ग्रॅम पाणी, ४़८ ग्रॅम काबरेदके, ०़९ स्रिग्धांश, ३़३ ग्रॅम प्रथिने व ११६ मिली ग्रॅम कॅल्शियम असते़ या ताकातून ४० कॅलरीज शरीराला मिळतात़ ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते़ नियमितपणे त्याचे सेवन केल्यास अॅसिडीटीचा त्रास कमी होतो़ शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते़ मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते़ ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्ण झाले असल्यास पोटात साठलेला आमदोष त्यामुळे कमी होतो़ औषधी गुणधर्म असलेले ताक त्यामुळे असली की नकली याचे मापन कसे करायचे याची फुलपट्टी सामान्य ग्राहकांकडे नसते़ म्हणूनच संधीसाधू विक्रेत्यांकडून कृत्रिमरित्या तयार केलेल्या ताकाची खुलेआम विक्री होताना दिसून येते़ अशी होते भेसळ ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली की त्यात सायट्रिक अॅसिड मिसळले असल्याचे लक्षात येते़ ताक बनवताना स्रिग्धांश काढून घेतले जातात़ स्रिग्धांशाचे प्रमाण ठरवलेल्या मानकापेक्षा कमी आले की कमी प्रतीचा पदार्थ मिळतो़ (प्रतिनिधी)