वीज ग्राहक त्रस्त; लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:33 IST2020-12-18T18:24:46+5:302020-12-18T18:33:31+5:30
महावितरण सरासरी वीज बिल बंद करणार का ?

वीज ग्राहक त्रस्त; लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक
औरंगाबाद : महावितरणला लॉकडाऊनच्या कालावधीत वीजग्राहकांकडील मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिले देण्यात आली. परंतु लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक दिला जात आहे. त्यामुळे शहरात महावितरण सरासरी
वीजबिल देणे बंद करणार का, असा सवाल वीज ग्राहकांकडून केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. या कालावधीत वीज ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. ही बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. या तक्रारींचे निवारण करता करता महावितरणची मोठी दमछाक झाली.
अनेक ग्राहकांचा लॉकडाऊनमधील वीज बिलांचा प्रश्न अजून सुटलेला नसताना अद्यापही सरासरी बिले येणे सुरूच आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. त्यात भरमसाठ वीज बिले पाहून नागरिकांकडून महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
सरासरी बिलांचे प्रमाण अत्यल्प
बंद घरात मिटर असणे अथवा फाल्टी मिटर असणे, यामुळेच ग्राहकांना सरासरी बिल दिले जाते. मात्र, सरासरी वीजबिल देण्याचे प्रमाण कमी आहे. बहुतांश ग्राहकांना रिडिंगनुसारच बिल दिले जाते. घर बंद नसेल आणि फॉल्टी मिटर नसल्यास सरासरी बिल देणे बंदच होईल. योग्य बिल न आल्यास ग्राहक तक्रार करू शकतात. त्याचे तात्काळ निवारण केले जाते.
- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण
महावितरण सांगते ही कारणे...
महावितरणने ग्राहकांचे वीज मिटर घराबाहेर बसवली आहेत. परंतु अद्यापही काही मिटर घरांत आहेत आणि घरे बंद असल्यानंतर त्यांना सरासरी बिले दिले जाते. तर काही ग्राहकांचे मीटर हे फॉल्टी आहे. ही मिटर बदलेपर्यंत सरासरी बिले दिले जात असल्याचे कारण महावितरण पुढे करत आहे.