‘दख्खनचा ताज’ बीबी का मकबराला टेकू; कोसळण्यापूर्वी संवर्धनाचे काम होणार का?
By संतोष हिरेमठ | Updated: March 6, 2025 17:45 IST2025-03-06T17:42:49+5:302025-03-06T17:45:01+5:30
जगप्रसिद्ध बीबी का मकबऱ्यातील भिंतीला टेकू देण्यात आला आहे. मकबरा आणि चारही मिनारचीही दुरवस्था झाली आहे.

‘दख्खनचा ताज’ बीबी का मकबराला टेकू; कोसळण्यापूर्वी संवर्धनाचे काम होणार का?
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबऱ्याच्या परिसरातील कोसळण्याच्या स्थितीतील ऐतिहासिक भिंतीला अक्षरश: लाकडी आणि लोखंडी खांबांचा टेकू देऊन वाचविण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. मुख्य मकबरा आणि चारही मिनारचीही अशीच अवस्था झाली आहे. ही परिस्थिती पाहून मकबरा कोसळण्यापूर्वी संवर्धनाचे काम होणार का, असा सवाल पर्यटकांमधून व्यक्त होत आहे.
बीबी का मकबरा येथे प्रवेश करतानाच प्रवेशद्वाराची दुरवस्था पाहून पर्यटकांना आतील परिस्थितीची काही कल्पना येते. मुख्य मकबऱ्यासह चारही मिनारची जागोजागी पडझड झाली आहे. प्लास्टर निखळले आहे. जागोजागी भेगा पडल्या आहेत. नक्षीकामही जागोजागी उखडून गेले आहे. जागोजागी मकबरा काळवंडला आहे.
तिकडे दुर्लक्ष, इकडे संवर्धन
मकबऱ्याची ही अवस्था असताना मकबऱ्याच्या पाठीमागील जागेतील ‘उत्तरी दालन’, ‘बारादरी’ अशी ओळख असलेल्या इमारतीच्या संवर्धनाचे काम वेगात सुरू आहे. याठिकाणपर्यंत फारसे पर्यटक येत नसतानाही संवर्धन होत आहे आणि ज्या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक असतात, त्या मुख्य मकबऱ्याच्या संवर्धनाकडेच दुर्लक्ष होत आहे.
दोन वेळा दुर्घटना
बीबी का मकबऱ्याच्या एका मिनारचा भाग कोसळण्याची धक्कादायक घटना १५ जून २०२४ रोजी दुपारी घडली होती. मिनारच्या सर्वांत वर असलेल्या जाळीचा भाग खाली पडल्यानंतर अक्षरश: त्याचा भुगा झाला. सुदैवाने या घटनेत कोणाला दुखापत झाली नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये अशीच घटना घडली होती. त्यानंतरही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने हा ऐतिहासिक वारसा धोक्यात आला आहे.
३ वर्षे लोटली
मकबरा आणि चारही मिनारच्या संवर्धनासाठी गेल्या ३ वर्षांपासून निधीची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, अद्यापही निधी मिळालेला नाही, असे पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी अंदाजपत्रक होईल मंजूर
मकबरा आणि मिनारच्या संवर्धनासाठी पावसाळ्यापूर्वी अंदाजपत्रक मंजूर होईल. त्यानंतर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बीबी का मकबऱ्यात किती पर्यटक? (२०२४)
महिना - भारतीय-परदेशी
जानेवारी- १,३४,४६६/१,३०१
फेब्रुवारी- ८९,१५३/१८८
मार्च- ६२,३४८/९५०
एप्रिल- ७३,९२४/३८६
मे- १,०४,६६०/२७०
जून- १,१५,६६८/२४८
जुलै- ८१,१२३/३२१
ऑगस्ट- ८६,८५६/३७९
सप्टेंबर- ६७,८७३/४८५
ऑक्टोबर- ६३,६७९/६३०
नोव्हेंबर- ९३,९३३/१,०४४
डिसेंबर- १,२५,०२२/९५०