निर्बंधाआधीच रविवारी बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:41+5:302021-06-28T04:04:41+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शहरात निर्बंध लावण्यात येणार आहेत. निर्बंध लागण्याआधीच रविवारचा मुहूर्त साधत ग्राहकांनी खरेदीसाठी ...

निर्बंधाआधीच रविवारी बाजारात गर्दी
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शहरात निर्बंध लावण्यात येणार आहेत. निर्बंध लागण्याआधीच रविवारचा मुहूर्त साधत ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. मात्र, सायंकाळी पावसाला सुरुवात होताच ग्राहक गायब झाले.
दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत येताच शहर अनलॉक करण्यात आले होते. यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण होते, पण हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण, कोरोनाची तिसरी लाट येणार या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या यादीत टाकले. यात औरंगाबादचाही समावेश आहे. जिल्ह्यात काय निर्बंध असतील, याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सोमवारी जाहीर करणार आहेत. पुन्हा एकदा बाजारपेठेत दुकानाच्या वेळेवर निर्बंध येणार आहे. यामुळे ऐनवेळी फजिती नको म्हणून रविवारी सकाळपासून ग्राहकांनी आवश्यक विविध सामान खरेदीसाठी बाजारात गर्दी सुरू केली होती. दुपारनंतर शहागंज, सराफा बाजार, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, कुंभारवाडा, रंगारगल्ली, औरंगपुरा, पैठणगेट या भागात खरेदीसाठी जास्त गर्दी झाल्याचे दिसून आले. दिवसभर शहरावर आभाळमाया होती. पण, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली आणि सर्व ग्राहकांनी बाजारातून काढता पाय घेतला. यामुळे जालना रोड, गजानन महाराज मंदिर रोड, गारखेडा, काल्डाकॉर्नर, पीर बाजार, उस्मानपुरा, या भागात वाहनांची गर्दी झाली होती. शहरात कारधारकांची संख्या वाढल्याने प्रमुख रस्त्यावर सर्वत्र कार व दुचाकीच दिसून येत होत्या. रस्ते सामसूम झाले होते. शहागंजात फळ विक्रेत्यांनी पावसाचा अंदाज घेऊन लवकरच हातगाड्या घराकडे नेल्या. रविवारी चांगला व्यवसाय होईल, या आशेने दुकानाचे शटर उघडलेल्या व्यापारी वर्गात मात्र, सायंकाळनंतर निराशा पसरली होती.