उद्योजकांसमोर अडचणींचा डोंगर
By Admin | Updated: July 23, 2014 00:33 IST2014-07-23T00:11:11+5:302014-07-23T00:33:09+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याकडे औद्योगिक विकास महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे़

उद्योजकांसमोर अडचणींचा डोंगर
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याकडे औद्योगिक विकास महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे़ कार्यालयीन कामकाजाच्या अडथळ्यांची शर्यत पार करून उद्योजक व्यवसाय चालवित आहेत़ उस्मानाबादेतील एमआयडीसीतील काही सुविधा वगळता इतरत्र परिस्थिती भीषण आहे़ मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळेच जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी भूखंड विकसित न करणेच पसंत केले आहे़
‘एमआयडीसी’ क्षेत्रामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबादसह भूम, कळंब, उमरगा आदी भागातील बाजारपेठेतील आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे़ त्यामुळे नवीन उद्योजकांना एखादा उद्योग सुरू करण्यास इथे वाव राहिलेला नाही़ औद्योगिक विकास महामंडळाने केवळ जिल्ह्यातील तब्बल १४१९.२२५ एकरवरील भूखंड वाटप करण्यावर भर दिला़ भूखंड वाटप केल्यानंतर तेथील आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे मात्र, कानाडोळा करण्यात आला आहे़ अनेकांनी उद्योग सुरू करण्याचे पाहिलेले स्वप्न मूलभूत सुविधांअभावी धुळीस मिळत आहे़ लाखो रूपये खर्च करून उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांनाही सद्यस्थितीत मुख्यत: पाणी, वीज व रस्ते या मुख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे़ अनेकांनी महामंडळावर अवलंबून न राहता आपल्या उद्योगाला उभारणी देण्याचा प्रयत्न केला आहे़
दोन कूपनलिकांवर उस्मानाबाद, उमरग्याची एमआयडीसी
उस्मानाबाद येथील एमआयडीसीतील उद्योजकांना केवळ दोन कूपनलिकांवर पाणी पुरविण्यात येत आहे़ पाणी कमी पडल्यानंतर अनेकजण पाणी विकत घेऊन गरज भागवित आहेत़ उस्मानाबाद शहरासाठीची उजनी उद्भव योजना पूर्णत्वास आली आहे़ त्यामुळे एमआयडीसी नजीकच्याच जलकुंभापासून पाईपलाईन करून पाणी उपलब्ध करून घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकारी सांगत आहेत़ मात्र, हे काम कधी पूर्ण होणार, याची खात्री मात्र, कोणालाच नाही !
अनेक प्लॉटवर कर्ज
अनेकांनी उद्योग सुरू करण्यासाठी घेतलेल्या भूखंडावर एमएसएफसी, डीआयसी, एमएसएसआयडीसी आदी विविध बँकांची कर्जप्रकरणे करून अनेक मंडळी बाजूला झाली आहेत़ बँकांनी कर्जवसुलीसाठी ते भूखंड इतरांनाही न देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत़ त्यामुळे जोपर्यंत कर्ज फिटत नाही, तोपर्यंत ते भूखंड पडूनच राहणार आहेत़ त्यामुळे या भूखंडाचा ना उद्योजकांना लाभ मिळतो ना महामंडळाला तेथून महसूल मिळतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे़
स्पर्धेत उद्योजक अयशस्वी
उस्मानाबादसह इतर ठिकाणच्या एमआयडीसी क्षेत्रात अनेकांनी उद्योग सुरू केले़ मात्र, कार्यालयीन कामकाज, नियमांचे अडथळे आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे अनेक उद्योजक उद्योगाला भरभराट देण्यात अयशस्वी ठरले आहेत़ कच्चा माल बाहेरून आणणे आणि उत्पादीत मालही बाहेरील बाजारपेठेत विक्री करण्याची वेळ जिल्ह्यातील उद्योजकांवर आहे़ काही प्रमाणात जिल्ह्यातील बाजारपेठेत माल विक्री केला जात असला तरी बाहेरील मोठ्या बाजारपेठेशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही़
उ
द्यो
ज
क
म्ह
ण
ता
त़़
उद्योजकांना कच्चा माल बाहेरून आणावा लागतो. शिवाय उत्पादित मालाला जिल्ह्यात चांगली बाजारपेठ नाही़ त्यामुळे इतर जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठेत मार्केटींग करून विक्री करावी लागते़ त्यामुळे शासनाने एमआयडीसीतील उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ उभा करून देण्याची गरज आहे़ एखादा मोठा कारखाना, उद्योग इथे उभा राहिला, तर इतर लघु उद्योगांनाही भरभराट येईल़ शिवाय मूलभूत सुविधा वेळेवर पुरविल्या तर उद्योजकांना त्याचा मोठा लाभ होईल, असे उस्मानाबाद येथील उद्योजक संतोष शेटे यांनी सांगितले़
भूम एमआयडीसीत माझे चार उद्योग सुरू आहेत़ हे चार उद्योग चालवून परिसरातील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे़ मात्र, महामंडळाकडे वारंवार मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत मागणी केल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे़ येथे रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधांचा अभाव मोठा आहे़ त्यामुळे अनेकांनी भूखंड घेतले असले तरी तेथे उद्योग सुरू केलेले नाहीत़ मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर येथील उद्योगास भरभराट येईल, असे भूम येथील विनोद जोगदंड म्हणाले़
एमआयडीसीतील उद्योग चालविणे म्हणजे अडथळ्यांची शर्यत पार करणे, असे गणित झाले आहे़ लहान-लहान बाबींसाठी अनेक अडचणींचा उद्योजकांना सामना करावा लागतो़ विजेचा लपंडाव हा कायम सुरू असून, पाण्याचाही प्रश्न भेडसावतो़ अनेक उद्योजकांना उद्योगाचे काम सोडून इतर कार्यालयीन कामासाठीच धावा-धाव करावी लागत असल्याची खंत उस्मानाबाद येथील उद्योजक संजय देशमाने यांनी व्यक्त केली़
लघु उद्योजक उद्योगाला चालविण्यासाठी मोठे प्रयत्न करतात़ मात्र, उत्पादित मालासाठी उस्मानाबाद येथे मोठी बाजारपेठ नाही़ त्यामुळे शासनाने एमआयडीसी क्षेत्रात उत्पादित होणारा माल विकत घेण्याची गरज आहे़ किंवा विविध शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य एमआयडीसीतून खरेदी करण्याकडे भर द्यावा, जिल्ह्यातच उत्पादीत मालाला चांगली बाजारपेठ मिळाली तर अनेक उद्योग चांगल्या पध्दतीने चालतील, असे महाराष्ट्र लघू उद्योग विकास संघटनेचे अध्यक्ष युवराज नळे यांनी सांगितले़
कळंब एमआयडीसीतील कच्चे रस्ते, विजेचा अभाव आणि पाण्याची समस्या हे प्रश्न गंभीर आहेत़ ३३ केव्ही ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे़ पथदिवे नसल्याने रात्रीच्यावेळी मोठ्या समस्या येथे येणाऱ्या कामगारांना सहन कराव्या लागत आहेत़ तर बँकांकडून उद्योजकांना कर्जरूपी अपेक्षित सहकार्य मिळत नाही़ जोपर्यंत मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार नाही, जोपर्यंत जिल्ह्यातील एमआयडीसी विशेषत: लघु उद्योजकांचा उद्योग सुरळीत चालणार नसल्याचे कळंब तालुका लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष सोमनाथ साबळे यांनी सांगितले़
उमरगा येथील एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते कच्चे असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत़ केवळ दोन कूपनलिका असून, त्याद्वारे अपेक्षित पाणी मिळत नाही़ उद्योगासाठी व झाडे जगविण्यासाठी उन्हाळ्यात पाणी विकत घेऊन वापरले आहे़ मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय उद्योजकांच्या व्यवसायाला चालना मिळणार नाही, असे उमरगा येथील उद्योजक नितीन होळे यांनी सांगितले़