छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये केवळ चमचमीत पदार्थ ठेवून चालत नाही. स्वयंपाकघरही तेवढेच स्वच्छ असावे लागते; अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. जानेवारीत ८० दुधाचे नमुने घेतले असले तरी हॉटेल्सवर कारवाई करण्यात आलेली दिसत नाही. काहींना सुधारण्याची ताकीद देण्यात आलेली आहे. त्यानंतरही त्यांनी बदल केला नाही तर त्या हॉटेलचे परवाने रद्द करण्याचा व दंडात्मक कारवाईचा इशारा पथकाने संबंधित हॉटेलला दिलेला आहे. परंतु कित्येक खाणावळी, स्टॉलवर सर्रास नियमभंग केला जात आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सिडको कॅनॉट, गजानन महाराज मंदिर, जवाहर कॉलनी, शहानूरमियाँ दर्गा परिसरात हॉटेलवर नागरिकांची गर्दी असते; परंतु स्वच्छतेची कोणतीही खबरदारी न बाळगता खाद्यपदार्थ उघड्यावरच ठेवलेले असतात. स्वस्त वडापाव, ब्रेडवडा, समोसा, खिचडी खाण्यासाठी गर्दी दिसते. या आठवड्यात कोणतीही पाहणी किंवा कारवाई केलेली नसल्याचे हॉटेल व सूत्रांकडून समजते.
काय पाहिजे वडा की समोसा?कॅनॉट परिसरात स्टॉलवर गर्दी असते; परंतु ते पदार्थ आरोग्यास लाभदायक आहेत का? तेल किती वेळा तळलेले वापरलेय? कोणी अधिकारी तपासण्यासाठी आला आहे का? असे विचारले असता, ‘कोणी येत नाही,’ असे सहज सांगून मोकळे होतात. काय पाहिजे? वडा की समोसा; असा प्रतिप्रश्न केला जातो.
नियम न पाळणाऱ्यावर कारवाई निश्चितआरोग्याच्या दृष्टीने सर्वांना स्वच्छता आणि सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिले असून स्वच्छ पाणी, साफसफाई, डस्टबिनबाबत सल्ला दिला आहे. अन्न शिळे वापरू नये, अशी हॉटेल व्यवस्थापन व स्टॉलधारकांना सूचना दिली आहे. खबरदारी न घेणाऱ्यावर प्रशासन वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करते.- अजित मैत्रेय, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन