रानडुकरांमुळे कपाशीसह पिकांचे नुकसान
By Admin | Updated: July 19, 2014 00:12 IST2014-07-18T23:36:08+5:302014-07-19T00:12:47+5:30
कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात गेल्या काही दिवसात रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरांमुळे कपाशीसह फळबागा व इतर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
रानडुकरांमुळे कपाशीसह पिकांचे नुकसान
कोळगाव : गेवराई तालुक्यातील कोळगावसह परिसरात गेल्या काही दिवसात रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरांमुळे कपाशीसह फळबागा व इतर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
गेवराई तालुक्यातील कोळगावसह तांदळा, काजळा, धारवंटा, बंगाली पिंपळा, उक्कडपिंपरी, माणकापूर, शिरसमार्ग, काळेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीसह तूर, भुईमूग या पिकांची लागवड केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांकडे फळबागाही आहेत. तर सिंदफणा नदीच्या परिसरासह काही शेतकऱ्यांकडे ऊसही आहे.
असे असले तरी गेल्या काही दिवसात या परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. अनेक ठिकाणी पंधरा ते वीस रानडुकरांचा कळप असल्याचे सर्रास दिसून येते. गेल्या आठवड्यात या परिसरातील शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केली आहे. मात्र पेरलेले बी रानडुकरे उकरून खात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे महागडे बियाणेही शेतकऱ्यांचे वाया जात असल्याने शेतकरी ही आर्थिक संकटात सापडला आहे.
या परिसरातील ऊस व फळबागांचीही रानडुकरांकडून नासधूस होत असल्याचे शेतकरी प्रल्हाद मस्के यांनी सांगितले. या परिसरातील काजळा, तांदळा येथे काही शेतकऱ्यांकडे डाळींब बागा आहेत. या बागांना आता फळ आले आहे. मात्र रानडुकरे फळांसह झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्याचे शेतकरी पप्पू डोंगरे यांनी सांगितले.
रानडुकरांचा त्रास वाढला असल्याने परिसरातील काही शेतकऱ्यांनी पिकांना तारांचे कुंपणही केले आहे. तर काही शेतकरी पिकांची रानडुकरांची नासधूस होऊ नये यासाठी रात्री शेतावर राखणीसाठीही जात असल्याचे शेतकरी गुलाब लोंढे यांनी सांगितले.
दरम्यान गेल्या काही दिवसात रानडुकरांचा उच्छाद अधिकच वाढला आहे. येथून जवळच असलेल्या शिरसमार्ग येथील शेतकरी पांडुरंग कारंडे यांना रानडुकरांनी जखमी केल्याची घटनाही गेल्या काही दिवसांपूर्वी घडली आहे.
रानडुकरांकडून पिकांच्या नासाडीसह शेतकऱ्यावर हल्ला होण्याचे प्रकार वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे या परिसरातील रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भगवान दातखीळ, पप्पूृ डोंगरे, अभिमन्यू कोटुळे, सुनील धस , सुनील शेरकर, नारायण ढगे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात वन विभागाचे अधिकारी जोशी म्हणाले की, जेथे उपद्रव आहे तेथील रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात येईल.(वार्ताहर)