धमकावून खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा
By Admin | Updated: August 18, 2014 00:40 IST2014-08-18T00:17:31+5:302014-08-18T00:40:42+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाविरुद्ध रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

धमकावून खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा
पाचोड : पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाविरुद्ध रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहाबुद्दीन अमिर खोजे यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, औरंगाबाद येथील हनिफ अन्वर यांचे आडगाव जावळे येथे खडीक्रेशर आहे. या क्रेशरवर शहाबुद्दीन हा मॅनेजर म्हणून काम पाहत आहे. शनिवारी रात्री दहा वाजता शहाबुद्दीन खोजे कामगारांसह बसले होते. याचवेळी शेजारी क्रेशरवर काम करणारा भाऊसाहेब विठ्ठल अहिरे हा आला व त्याने दमदाटी सुरू केली. तुमच्या मालकाने मला क्रेशर चालू ठेवण्यासाठी ७५ हजार रुपये का दिले नाही. मला आता एक लाख रुपये द्या. नाही तर मी तुम्हाला कुऱ्हाडीने तोडून टाकील, तुमच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार देईन व तुम्हाला जेलमध्ये घालतो. मालकाने जर सकाळपर्यंत एक लाख रुपये दिले नाही तर याद राखा.
मी तुम्हाला झोपेत कुऱ्हाडीने घाव घालून ठार करील, असे म्हणून तो तेथून फरार झाला. यानंतर शहाबुद्दीन व तेथे असणारे कामगार घाबरून गेले. त्यांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी खंडणी मागणाऱ्याचा शोध घेतला; पण तो मिळून आला नाही. रविवारी भाऊसाहेब अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)